केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा इशारा
रत्नागिरी:- कोरोनाच्या कालावधीत देशासह राज्यातील औषध विक्रेते जीवावर उदार होऊन सेवा देत आहेत. मात्र या सेवेकडे केंद्र व राज्य सरकारने पुर्णतः दुर्लक्ष केले आहे. औषध विक्रेत्यांची सेवा लक्षात घेऊन त्यांना लसीकरणात अग्रक्रमाने सहभागी करून घ्या अन्यथा लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा संघटनेचे अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेला आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोविड – 19 च्या प्रादुर्भावाची पहिली लाट ओसरुन दुसऱ्या लाटेला सर्वजण सामोरे जात आहोत. कोविड- 19 च्या महामारीत अग्रक्रमाने काम करणाऱ्यांच्या यादीत कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने संपूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. लसीकरण कार्यक्रम सुरु झाला, औषधी विक्रेता व तेथील कर्मचारी हे आपल्या जीवावर उदार होऊन 24 तास सेवा देत आहेत व त्यामुळेच संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहण्यात मोठी मदत झालेली आहे. औषधी विक्रेत्यांचा प्रत्यक्ष संबंध हा कोविड पेशंट अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांशी जवळून येतो व त्यात त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रासह देशात २०० पेक्षा अधिक औषध विक्रेते कोविड 19 चे बळी पडले असून, 1000 च्या जवळपास परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत. असे असूनही केंद्र किंवा राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच परंतु साधे लसीकरणात प्राधान्य देण्याचे औदार्य देखील दाखवले नाही याची खंत सर्व औषधी विक्रेते त्यांचे कर्मचारी यांच्या मनात आहे. सरकारच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराचीही दाखल शासनाने घेतली नाही. सरकारची भूमिका अशीच राहिल्यास सभासदांचा वाढता दबाव लक्षात घेता संघटनेलला संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव व्यवसाय बंदची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेला आहे.