Sunday, September 20, 2026
spot_img
Home रत्नागिरी राजीवडा खाडी मुखात नौका अडकली गाळात

राजीवडा खाडी मुखात नौका अडकली गाळात

१४३ कोटींच्या प्रकल्पासह गाळ काढण्याचा प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी

रत्नागिरी:- शहराजवळील राजीवडा खाडी मुखाशी मच्छीमारांना जीव मुठीत घेऊन नौका ने -आण करावी लागत आहे. तांडेलला पाण्याचा अंदाज न आल्याने राजिवड्यातील मच्छीमारी नौका काल खाडी मुखातील गाळामध्ये अडकली. सकाळी आडकलेली ही नौका दुपारी समुद्राच्या भरतीच्या लाटांमुळे निघाली. त्यामुळे चार तास या मच्छीमारांचा जीव टांगनीला लागला होता. त्यामुळे मंजूर झालेल्या कामातून या खाडीमुखातील गाळ लवकरात लवकर काढुन मच्छीमारांना ये-जा करण्यासाठी चायनल तयार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु आता पावसाळा सुरू होणार असल्याने आणि विधान परिषदेची आचारसंहिता लागल्याने या कामाला मुहूर्त मिळालेला नाही.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ३१ जुलै, २०२५ ला जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील राजीवडा येथे खाडीच्या मुखाजवळ ‘ब्रेक वॉटर पॉल ग्रोयान्स टाईप’ बंधारा बांधणे आणि खाडीतील गाळ काढणे या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी १४३ कोटी, ९६ लाख, ८१ हजार, ३५५ रुपये इतक्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते राजीवडा (ता. रत्नागिरी) येथे खाडी मुखाजवळ ब्रेक वॉटर पॉल ग्रोयान्स टाईप बंधारा बांधणे व खाडी मुखाजवळ गाळ काढणे’ या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने २०२२-२३ च्या राज्य दरसूचिवर आधारित अंदाजपत्रक तयार केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या अंदाजपत्रकाची तपासणी केली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च रु. १४३.९७ कोटी इतका आहे.

परंतु या मंजूर कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे मासेमारीचा यंदाचा हंगाम संपला तरी गाळ काढण्याच्या कामाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यांनंतरच हा गाळ काढण्याचे सुरू होईल, असे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अजूनही राजीवडा भागातील मच्छीमारांना गाळात रुतलेल्या खाडीतूनच भरतीची वाट पाहून वाट काढावी लागत आहे. काल ओहोटीला एक मच्छीमार राजीवड्यात जात असताना तांडेलला अंदाज न आल्याने नौका गाळात रूतली. त्यामुळे सुमारे चार ते पाच तास भरतीची वाट पहावी लागील. भरतीचे पाणी वाढल्यानंतर ही नौका गाळातून बाहेर निघाली. त्यामुळे लवकरात लवकर या खाडीमुखातील गाळ काढण्याची मागणी मच्छीमार करत आहेत.