Wednesday, August 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी राजापूरातील शेतकऱ्याचा विषबाधेमुळे मृत्यू

राजापूरातील शेतकऱ्याचा विषबाधेमुळे मृत्यू

शेतात तणनाशक फवारताना घडली दुर्घटना

राजापूर:- राजापूर तालुक्यातील चिखलगाव येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात तणनाशक फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मृत अनिल कोरगावकर यांनी १८ जुलै २०२६ रोजी आपल्या राहत्या गावी शेतात तणनाशक फवारणी केली होती. यादरम्यान दारूच्या नशेत असताना तणनाशक औषध उडून त्यांच्या नाकात व तोंडात गेल्याने त्यांना विषबाधा झाली. दुसऱ्या दिवशी (१९ जुलै रोजी) त्यांना उलट्या व अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना प्रथम उपचारासाठी फॅमिली डॉक्टरांकडे नेले. तिथे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आल्याचे निष्पन्न झाले.

प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना २२ जुलै २०२६ रोजी पुढील उपचारासाठी मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर त्यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २३ जुलै रोजी त्यांचे डायलिसिसही करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान २४ जुलै २०२६ रोजी पहाटे वॉर्ड क्रमांक २० मध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.