नगर परिषदेची मोठी कारवाई
राजापूर:- राजापूर शहरातील मुख्य बाजारपेठ आणि शिवाजीपथ परिसरात सार्वजनिक रस्ता अडवून, अस्वच्छता पसरवत बेकायदेशीररीत्या मासे विक्री करणाऱ्या १३ महिला विक्रेत्यांविरुद्ध राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता पथकाने वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
राजापूर नगर परिषदेच्या हद्दीतील शिवाजीपथ ते बाजारपेठ या सार्वजनिक रस्त्यावर काही महिला मासे विक्रीसाठी बसत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या महिलांमुळे पादचारी आणि व्यापाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (दि. १३ मार्च २०२६) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, स्वच्छता मुकादम राजन जाधव आणि सफाई कर्मचाऱ्यांचे पथक कारवाईसाठी गेले होते. पथकाने महिलांना नेमून दिलेल्या ‘मच्छी मार्केट’मध्ये जाऊन बसण्याच्या सूचना दिल्या. मात्र, संबंधित महिलांनी तिथे जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि सार्वजनिक रस्त्यावरच मासे विक्री सुरू ठेवली.
या ठिकाणी मासे साफ करून टाकलेली खवले आणि सांडलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. नगर परिषदेने वारंवार सांगूनही या महिला प्रशासनाच्या आदेशाला जुमानत नसल्याने अखेर पालिकेने कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे.
नगर परिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव (वय ५५, रा. धोपेश्वर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलिसांनी सुमया बोरकर,नाजिया वाडकर,निलोफर होडेकर, आक्सा समीर सोलकर,मिनाज भाटकर, रुक्शाना बोरकर, अनिसा सोलकर, आक्सा पावसकर, नाजिया नुरुद्दीन मंचेकर, मुमताज तौफीक पिरकर, शबाना सलीम काझी, मुमताज सलीम फडणीस आणि नसरिन सोलकर या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र नगरपालीका, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम २६७, २६९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहील, असा इशारा नगर परिषदेने दिला आहे.









