राजापूर:- मुंबई–गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील कोंडये पुलावर काल रात्री भीषण अपघात घडला. अज्ञात भरधाव वाहनाच्या जोरदार धडकेत एका पादचारी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पसार झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण रात्रीच्या सुमारास कोंडये पुलावरून पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की तरुण रस्त्यावर फेकला गेला. डोके व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी आणि महामार्गावरील इतर वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
दरम्यान, अपघात घडवून पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध पोलीस घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींकडूनही माहिती संकलित केली जात आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.









