दिल्लीतील बैठकीनंतर राज्य, स्थानिक पातळीवर घडामोडींना वेग
रत्नागिरी:- दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सौदीचे राजपुत्र महमद बिन सलमान यांच्याशी झालेल्या करारामुळे राजापूरातील रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा दृष्टीक्षेपात आला आहे. या प्रकल्पामुळे केवळ राजापूरच नव्हे तर संपूर्ण कोकणचा कायापालट होणार आहे. या करारानुसार सौदी अरेबिया सुमारे 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
राजापूर तालुक्यात गेली 7 ते 8 वर्षे रिफायनरी प्रकल्प संदर्भातील घडामोडी सुरु आहेत. 2016 मध्ये सौदीचे राजपूत्र यांच्याशी भारतात 3 लाख कोटी गुंतवणूकीसाठी करार झाला होता. या कराराला अनुषंगून राजापूर तालुक्यातील नाणार येथील जागा निश्चित करण्यात आली होती. या संदर्भात मार्च 2017 मध्ये अधिसूचना काढून या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न झाला. यावेळी 15 हजार एकर भूसंपादन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. नाणार येथे प्रकल्पाला विरोध होवू लागल्यानंतर अचानक या प्रकल्पाबाबत चढ-उतार सुरु झाले. मात्र 7 हजार 500 एकर जमिनींचे संमतीपत्र प्रकल्प समर्थकांनी शासनाकडे सुपूर्त केली.
नाणार येथे बाहेरील गुंतवणूकदारांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप करून प्रकल्पसंदर्भात विरोधकांनी रणशिंग फुंकले. मात्र कोकणात प्रथमच प्रकल्पाच्या बाजूनेही मोठा जनसमुदाय एकवटला. प्रकल्प आला तर विरोध हा कोकणावर पडलेला शिक्का अनेक समर्थकांनी पुसून विरोधकांना तितक्याच तोडीने प्रतिकार केला.
राजकीय भिन्न मतप्रवाहातून या प्रकल्पाला विलंब होत गेला. विरोध नको म्हणून प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आली. काही दिवसांनी प्रकल्पाची जागा बारसूकडे सरकली होती. नाणार व बारसू या दोन्ही ठिकाणी कमीत कमी प्रकल्पबाधित व्हावेत यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. दोन्ही ठिकाणी कातळ व पड जमीन असल्याने स्थानिकांचा विरोध कमी प्रमाणात होता. दरम्यान, या प्रकल्पाला विलंब होत गेल्याने सौदी अरेबियाकडून या प्रकल्पातून लक्ष कमी करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात मोठ्या क्षमतेचा प्रकल्प पाकिस्तानात गेल्याने रिफायनरीसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सोमवारी झालेल्या बैठकीमुळे या प्रकल्पाचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.
जामनगर पेक्षाही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा अधिक प्रगत तंत्रज्ञान असलेला असणार असल्याचा निर्वाळा शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. 2016मध्ये तेलशुध्दीकरण प्रकल्पासाठी सौदी अरेबियाच्या आरामको कंपनीने गिर्ये देवगड येथे कच्चे तेल उतरवण्यासाठी बंदर उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या बंदरालाही आता चालना मिळेल असे स्थानिकांचे मत आहे.
रिफायनरीबाबत सौदीचे युवराज महमद बिन सलमान यांनी भारत सरकारबरोबर केलेल्या करारानुसार सुमारे 4 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे ही रिफायनरी लवकरच कार्यन्वित होईल असा विश्वास व्यक्त करतानाच सौदी अरेबिया ही या प्रकल्पात धोरणात्मक भागिदार असल्याचेही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी द्विपक्षीय कृतिशील गटही स्थापन करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी या करारानंतर सांगितले आहे.
रिफायनरीला बारसू येथे संमत्ती मिळाल्यास त्याचा फायदा थेट रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला मिळणार आहे. सौदी अरेबिया आणि भारत यांच्यात झालेल्या रिफायनरी गुंतवणुकीबाबतच्या करारामुळे रिफायनरी समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच झाला पाहिजे असे स्पष्ट मते त्यांनी व्यक्त केली. मंगळवारी बारसू समर्थकांनी बारसूच्या माळरानावर एकत्रीत होवून विकासाची गंगा लवकर येऊदे अशी मागणी करतानाच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
नाणारसह बारसूमध्ये प्रकल्प होणार
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणारसह बारसूमध्ये हा प्रकल्प होणार असल्याचा विश्वास समर्थकांमधून व्यक्त होत आहे. पूर्णक्षमतेने प्रकल्प करण्यासंदर्भात सौदी अरेबियाच्या राजपूत्राशी भारत सरकारचा झालेला करार हा 60 एमएमटीपीए असल्याने बारसूतील जागा कमी पडू शकते. यामुळे हा प्रकल्प नाणारसह बारसूमध्ये होणार असे खात्रीलायक वृत्त आहे.









