उबाठाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास
रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीत लांजा राजापूर मतदार संघात माजी आमदार राजन साळवी यांनीच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या सभा पक्षाकडू दिल्या जात असतानाही घेतल्या नाहीत. सहकार्य मिळत नसल्याबाबत त्यांनी त्यावेळीच सांगितले असते तर वरिष्ठांनी दखल घेतली असती, असे स्पष्ट मत शिवसेना उबाठाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. माजी आम. राजन साळवी, तालुकाप्रमुख बंड्या साळवी व अन्य पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी दौर्यावर आलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना आपली मते व्यक्त केली. सध्या दक्षिण रत्नागिरीतील अनेक पदाधिकारी पक्ष सोडणार असल्याच्या वृत्ताचे खंडण करताना, त्यांनी या अफवा असल्याचे सांगितले. लांजा राजापूर मतदार संघात झालेल्या पराभवानंतर माजी आ. राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली आणि आपण यापुढेही पक्षाशी इमानी राहून पक्ष वाढीचे काम करु असे सांगितले. निवडणुकीच्या वेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही या मतदार संघात सभा घेण्यास तयार होते. परंतु साळवी यांनी सभा घेतल्या नसल्याचे सांगितले. राजन साळवी लांजा येथे काय बोलले हे आपल्याला माहित नाही. परंतु त्यांना मदत मिळाली नव्हती तर त्यांनी त्याचवेळी वरिष्ठांच्या कानावर घालायला हवे होते. असे मतही राऊत यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी तालुक्याचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी हे नाराज असून शिंदे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा असल्याबद्दल मा. खा. राऊत म्हणाले की, बंड्या साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके व अन्य कोणतीही पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाहीत, या अफवा पसरवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार भास्कर जाधव हे शिवसेना उबाठाचे नेते आहेत. पक्षाच्या कार्यकारिणीत त्यांनी आपली मते मांडावीत, सेनेची मांडणी ही बाळासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे त्यावर कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. पक्षात तालुकापासून जिल्ह्यापर्यंत फेरबदल केले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
सध्याच्या राजकारणात अनेक स्थिंत्यंतर होतील असे चित्र आहे. शिवसेना उबाठा यासर्व गोष्टीतून नक्की उभारी घेईल असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. मुंबई महानगर पालिकेत ताकदीने उतरण्यासाठी तयारी पक्षाने सुरु केली आहे. निवडणुका जाहीर झाल्यावर आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल असेही माजी खा. राऊत यांनी सांगितले.