राजकीय दृष्ट्या दादागिरी करुन डॉक्टर्सना त्रास देण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही

रत्नागिरी:- जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा चांगल्या प्रकारे सेवा बजावत आहे. राजकीय दृष्ट्या दादागिरी करुन डॉक्टर्सना त्रास देण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर प्रशासनाला संबंधितांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यानंतर त्यांनी महिला रुग्णालयातील कोव्हीड हॉस्पीटलचा शुभारंभ फित कापून केला.

या रुग्णालयाच्या उद्घाटनापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ना. सामंत म्हणाले की, सद्य परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ही काही राजकीय स्टंटबाजी किंवाहह आरोप-प्रत्यारोप करण्याची परिस्थिती नाही. रत्नागिरीमध्ये आवश्यकता असेल तर खासगी रुग्णालय ताब्यात घेण्यात येतील, येथील डॉक्टरांनीही आपली रुग्णालये कोव्हीडसाठी देण्याची तयारी दर्शवली असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. सध्या जिल्हा रुग्णालयात 8 तर महिला रुग्णालयासाठी 6 फिजिशियन असल्याचेही माहिती त्यांनी दिली.

शिमग्यापासून आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 2 लाख 95 हजार चाकरमानी दाखल झाले आहेत. गेल्या सात दिवसात 15हजार चाकरमानी आले आहेत. यातील प्रत्येक चाकरमान्यांची रॅपिड टेस्ट केली जात आहे. जे या टेस्टमधून सुटत आहेत. त्यांची माहिती आशा वर्कर यांच्याकडे गोळा होत असून, त्यानंतर टेस्ट केली जात आहे. पालकमंत्री ना. परब यांनी परिवहन खात्यातर्फे एसटीच्या बसेस सुरु केल्याने त्याचा फायदा चाकरमान्यांना झाला असून ते थेट गावी दाखल होत असून, चाकरमान्यांकडून समाधान व्यक्त केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ओणी येथे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पीटलची मागणी आ. राजन साळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.