14 लाख 51 हजार मतदार, 1942 मतदान केंद्र; 8588 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
रत्नागिरी:- अठराव्या लोकसभेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज मतदान होणार असून तब्बल 14 लाख 51 हजार 630 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1942 मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 8588 कर्मचाऱ्यांसह 120 पोलीस अधिकारी,2680 पोलीस कर्मचारी, 1692 होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली असून आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करण्याची संधी आहे. यावेळी मतदान होण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी 70 टक्केपर्यंत मतदान होईल असा विश्वास व्यक्त करत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेद्वारे मतदारांना केले आहे.
अठराव्या लोकसभेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज होणाऱ्या मतदानासाठी गेले सहा महिने जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे. 13159 नव्या मतदारांसह एकूण 14 लाख 51 हजार 630 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. यासाठी 1942 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. तर प्रत्येक मतदान केंद्रासाठी चार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी 5 वाजता निवडणुकीच्या तांत्रिक प्रक्रियेला सुरूवात होईल. त्यानंतर सकाळी 7 वाजता मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. मतदान केंद्रावर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेच अडचण निर्माण झाल्यास ती सोडविण्यासाठी सेक्टर ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली असून तब्बल 281 सेक्टर ऑफिसर कार्यान्वित राहणार आहेत.
आतापर्यंत 400 पैकी 388 दिव्यांगांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर 1094 कर्मचाऱ्यांपैकी 60 कर्मचाऱ्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले आहे. तर 2673 ज्येष्ठ नागरिकांपैकी 2493 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर 180 नागरिकांची मतदानाची संधी हुकली आहे.
निवडणुकीच्या कालावधीत 14 लाख 49 हजार 735 रोख रकमेसह 2 कोटी 46 लाख 22 हजार 893 रु.चे मद्य जप्त करण्यात आले आहे. काही हत्यारे, ड्रग्जवरही कारवाई करण्यात आली आहे. 164 ठिकाणी दारूबंदी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 252 नॉनबेलेबल वॉरंट बजावण्यात आले असून जिल्ह्याच्या पाचही सीमांवर कडक नाकाबंदी सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. निवडणुकीत चार तक्रारी प्राप्त झाली असून त्याची शहानिशा सुरू आहे. तर मॉडेल मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. सात ठिकाणी मतदान केंद्रांवर सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सात ठिकाणी दिव्यांग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहा ठिकाणी तरूण अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चिपळूण, राजापूर, कुडाळ, मालवण येथे आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेसाठी 225 एसटी बसेस घेण्यात आल्या आहेत तर अन्य वाहनांचाही समावेश करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.