Tuesday, June 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट

जपानच्या ३,७०८ कोटींच्या निधीतून मिळणार अत्याधुनिक यंत्रसामग्री!

रत्नागिरी:- जिल्ह्याच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा ठरला आहे. कोकणच्या या मध्यवर्ती भागात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याची ओरड अनेकदा होत असते, मात्र आता या तक्रारींना पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रत्नागिरीसह राज्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपेरेशन एजन्सीकडून (JICA) तब्बल ३,७०८ कोटी रुपयांचे अर्थसाह्य घेण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासाला आता बुलेट ट्रेनचा वेग मिळणार आहे.

‘महाराष्ट्रातील त्रिस्तरीय आरोग्य सेवा वितरण, वैद्यकीय शिक्षण आणि नर्सिंग प्रणाली बळकटीकरण’ या विशेष प्रकल्पांतर्गत रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. या निधीचा मोठा हिस्सा रत्नागिरीतील महाविद्यालयासाठी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरला जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या उपचारांसाठी कोल्हापूर किंवा मुंबईकडे धाव घ्यावी लागते, परंतु आता जागतिक दर्जाची उपकरणे उपलब्ध होणार असल्याने जटील शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांचे निदान रत्नागिरीतच करणे शक्य होईल.

या प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘भारत-जपान शैक्षणिक आदान-प्रदान’ कार्यक्रम. याअंतर्गत रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, प्राध्यापक आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. जपानच्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा आणि कार्यपद्धतीचा लाभ स्थानिक मनुष्यबळाला मिळणार असून, त्यातून रुग्णांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणारे हे आर्थिक बळ केवळ पायाभूत सुविधांपुरते मर्यादित नसून, ते आरोग्य क्रांतीचे प्रतीक ठरणार आहे. अत्याधुनिक रुग्णालयीन व्यवस्था, सुसज्ज प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग यामुळे रत्नागिरीचे हे महाविद्यालय भविष्यात कोकण विभागातील एक प्रमुख आरोग्य केंद्र म्हणून नावारूपास येईल. राज्य सरकारच्या या दूरगामी निर्णयामुळे रत्नागिरीकरांना आता आपल्याच जिल्ह्यात ‘हायटेक’ उपचार मिळणार असून, आरोग्य सेवेतील ही जपानी मदतीची संजीवनी जिल्ह्यासाठी खरोखरच वरदान ठरणार आहे.