नरहर वसाहत येथील घटना; नागरिकांमध्ये घबराट
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग असलेल्या अभ्युदयनगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या चक्क एका घराच्या आवारात शिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. शहरात भरवस्तीत बिबट्याने प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील अभ्युदयनगर येथील नरहर वसाहत येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. या वसाहतीत राहणारे स्थानिक नागरिक संदेश कलंगुटकर यांचा पाळीव कुत्रा रात्री १ वाजण्याच्या सुमारास अचानक जोरजोराने भुंकू लागला. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा आणि आक्रमक असल्याने कलंगुटकर यांना संशय आला.
त्यांनी तात्काळ झोपेतून उठून खिडकीतून बाहेर पाहिले असता, रस्त्यावर इतर भटकी कुत्री देखील जोरात भुंकत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय बळावल्याने त्यांनी आपल्या घराच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. यामध्ये त्यांना बिबट्या प्राण्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला.
मागील काही दिवसांपासून शहरालगत असलेल्या नाचणे आयटीआय परिसरात काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता थेट अभ्युदयनगरसारख्या गजबजलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या भागात बिबट्या दिसल्याने हा बिबट्या अन्नाच्या शोधात शहरात शिरल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
संदेश कलंगुटकर यांनी या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली आहे. नरहर वसाहत हा अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने वन विभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.









