चार दिवसात ५२,५०० दंड ; मास्क न वापरणे पडले भारी
रत्नागिरी:- जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी प्लास्टिसमुक्तीचा संकल्प सोडला आहे. स्वच्छता आणि पर्यटनवाढीच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्लास्टिकविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. रत्नागिरी शहरामध्ये पालिकने गेल्या चार दिवसांमध्ये ६२ जणांवर कारवाई करून ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे तर मास्कविरोधातही कारवाई सुरू आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये आठ जणांवर कारवाई करून चार हजाराचा दंड वसूल केला.
जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी यापूर्वीच त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन शासकीय कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली. जिल्ह्यातील किनारपट्टींवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी पाटील स्वतः या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ती यशस्वी झाली आहे; मात्र या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सापडले. या प्लास्टिकमुळे पावसाळ्यात गटार तुंबून पाणी शहर आणि घरांमध्ये शिरते. समुद्रातही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जाते. पाण्यातील जीवांवर याचा मोठा परिणाम होतो म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी प्लास्टिक मुक्तीच्या दृष्टीने संकल्प सोडला आहे. त्याची अंमलबजवणी शहरी आणि ग्रामीण भागात सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी आता प्लास्टिक पिशव्या मिळत नाहीत.
टपऱ्यांचीही तपासणी सुरू
अनेकजण राजरोस प्लास्टिक पिशव्यांची विक्री करत आहेत. त्याच्या विरोधात पालिकेच्या मालमत्ता विभागाचे पथक राबत आहे. वेगवेगळ्या दुकानांची, टपऱ्यांची तपासणी सुरू आहे. ७ ते ११ जानेवारीपर्यंत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ६२ जणांकडे प्लास्टिक पिशव्या सापडल्या. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क अनिवार्य केले तरी ते न वापरणाऱ्या ८ जणांवर कारवाई करून चार हजार दंड वसूल केला.









