रत्नागिरी:- राज्यातील अनेक कारागृहांवर कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ताण निर्माण झाला असताना रत्नागिरीतील विशेष कारागृहाची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. २४६ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या २०४ बंदिवान आहेत. मात्र, यामध्ये कच्च्या म्हणजेच अंडरट्रायल कैद्यांची संख्या १६६ इतकी असून, एकूण बंदिवानांमध्ये त्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
रत्नागिरीतील विशेष कारागृहात १९३ पुरुष आणि ११ महिला बंदिवान आहेत. यामध्ये तीन शिक्षाधीन बंदी, जन्मठेपेची शिक्षा भोगणारे खुल्या कारागृहातील ३८ बंदी आणि १६६ कच्चे कैदी आहेत. गुन्ह्याचा आरोप झाल्यानंतर न्यायालयाचा अंतिम निकाल न लागलेल्या आरोपींना कच्चे किंवा अंडरट्रायल कैदी म्हटले जाते. चोरी, घरफोडी, मारामारी तसेच आपापसांतील वादातून घडलेल्या गुन्ह्यांतील आरोपींचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव विशेष कारागृह असल्याचे सांगण्यात येते.
खटल्यांच्या सुनावणीला होणारा विलंब, वारंवार पडणाऱ्या तारखा, साक्षीदारांची वेळेत न होणारी साक्ष आणि सरकारी वकिलांची अपुरी उपलब्धता यामुळे अनेक खटले दीर्घकाळ प्रलंबित राहतात. परिणामी, अंतिम निकाल न लागल्याने आरोपींचा कारागृहातील मुक्काम वाढतो. किरकोळ गुन्ह्यांतील आरोपींना वेळेत जामीन न मिळाल्यास त्यांचाही कारागृहातील कालावधी वाढतो. त्यामुळे प्रलंबित खटले जलदगतीने निकाली काढणे, जामीन प्रक्रियेला गती देणे आणि आवश्यकतेनुसार कारागृहांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.









