Thursday, November 12, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी-पावस बायपासवर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

रत्नागिरी-पावस बायपासवर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

तरुण जखमी, ट्रकचालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या बायपास मार्गावरील दर्गा स्टॉपजवळील वळणावर भरधाव व बेदरकारपणे चालवलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला राँग साईडला येऊन जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर आत्माराम चव्हाण (वय ५१, रा. नाणीज, तळवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे, तर ओंकार मधुकर शिंदे (वय ३५, रा. नाखरे, उंबरवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. आरोपी समीर चव्हाण हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच-०९-सीयू-१९७८) घेऊन रत्नागिरी-पावस बायपास रोडने जात होता. दर्गा स्टॉपच्या पुढील वळणावर आला असता, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्याने अत्यंत हयगयीने व बेदरकारपणे ट्रक चालवून थेट राँग साईडला नेला. यावेळी समोरून येणाऱ्या ओंकार शिंदे यांच्या स्प्लेंडर दुचाकीला (क्र. एमएच-०८-एई-७२२९) ट्रकने जोरदार ठोकर दिली.

या अपघातात दुचाकीस्वार ओंकार शिंदे यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या असून ट्रक आणि दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार वैभव शशिकांत कांबळे (वय ३४, नेमणूक पूर्णगड सागरी पोलीस ठाणे) यांनी दि. ११ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रकचालक समीर चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णगड सागरी पोलीस करत आहेत.