रत्नागिरी:- नगर परिषद फंड अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या नागरी विकासासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्यानंतर रत्नागिरी नगर पालिकेसाठी २० कोटी रुपये तर राजापूर नगर पालिकेसाठी १९ कोटी रुपये असा एकूण ३९ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे. नगरविकास विभागाने १० जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील स्वतंत्र शासन निर्णय जारी केला असून, या निधीतून दोन्ही नगर पालिकांमधील विविध मूलभूत सुविधा आणि विकासकामांना आता गती मिळणार आहे.
रत्नागिरी नगर पालिकेसाठी मंजूर झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीमुळे रत्नागिरी शहरातील प्रशासकीय इमारत, शाळा, पाणी वितरण व्यवस्था, नाट्यगृह आणि नाले आदि विकासाची कामे मार्गी लागणार आहेत. रत्नागिरी नगर पालिकेसाठी मंजूर २० कोटी निधीमध्ये १४.३० कोटी रुपये ‘वैशिष्ट्यपूर्ण योजना’ आणि ५.७० कोटी रुपये ‘मोटार वाहन कर अनुदान (रस्ता अनुदान)’ या दोन स्वतंत्र योजनांमधून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या निधीतून रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील विकासकामे, प्रभाग क्रमांक १ ते १६ मधील शाळांच्या इमारतींचे बांधकाम, पानवल परिसरातील पाणी वितरण व्यवस्थेचे काम तसेच नाट्यगृहातील अग्निशमन अनुषंगिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. याशिवाय प्रभाग १ ते १६ मधील पूल आणि रस्त्यालगतच्या नाल्यांच्या विकासाची कामेही या निधीतून करण्यात येणार आहेत.
राजापूर नगरपालिकेलाही १९ कोटींची मोठी मदत
राजापूर नगर पालिकेसाठीचा १९ कोटी रुपयांचा निधी ‘वैशिष्ट्यपूर्ण योजना’अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहराच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.
या मंजूर निधीतून नवीन प्रशासकीय इमारत, बहुउद्देशीय सभागृह, मच्छी व मटण मार्केट इमारत, शाळांची दुरुस्ती आणि उद्यान विकास, तसेच जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामांमुळे राजापूर शहरातील नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.









