रत्नागिरी नगर परिषदेसाठी 64 हजार 746 अंतिम मतदार

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 10 नोव्हेंबरपासून दाखल होणाऱ्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेपासून निवडणूक ते 3 डिसेंबर निकालापर्यंताया तयारीला वेग आला आहे. या निवडणूकीसाठी न.प.हद्दीत एकूण 69 मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून 64 हजार 746 मतदार आपला मतदाना हक्क बजावणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेच्या माहितीसाठी गुरूवारी नगर परिषदेत देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव गारवे हे देखील उपस्थित होते. आचारसंहितेची अंमलबजावणी आणि या निवणूकीसाठी अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये सन 2011 च्या जनगणनेनुसार शहरी 76,229 लोकसंख्या आहे. न.प.चे 16 प्रभाग असून या प्रभागातून 36 सदस्य नगरसेवकांना निवडून दिले जाणार आहेत. शहरी निर्धारित केलेली मतदारसंख्या 64,746 इतकी आहे. त्यामध्ये पुरूष मतदारसंख्या 31,324 तर महिला मतदारसंख्या 33,421 आणि इतर मतदार एक इतकी आहे. सर्वात जास्त मतदार संख्या असलेल्या प्रभागांमध्ये 13 नंबरचा प्रभाग असून 1037 मतदारसंख्या आहे. तर सर्वांत कमी मतदारसंख्या प्रभाग 2 मध्ये 802 इतकी आहे.
शहरात या निवडणूकीसाठी 69 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. याठिकाणी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्यो सांगण्यात आले.
या निवडणूकीत मतदार एका प्रभागातून दोन सदस्य, आणि एक थेट नगराध्यक्ष अशा तिघांना मतदान करण्यात येणार आहे. राखीव मधून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना जातप्रमाणपत्र, जातपडताळणी केल्याचे पत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. उमेदवार निवडून आल्यावर हे प्रमाणपत्र 6 महिन्यात सादर करावे लागणार आहे. या निवणूकीसाठी असलेल्या उमेदवारांच्या खर्च मर्यादेनुसार नगराध्यक्ष पदासाठी 11 लाख 25 हजार तर नगरसेवक पदासाठी 3 लाख 50 हजार इतकी मर्यादा देण्यात आली आहे.

या निवडणूकीसाठी प्रशासनस्तरावर एका आदर्श मतदानकेंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. तर एका केंद्रावर सर्व महिला अधिकारी असतील अशीही निर्मिती केली जाणार आहे. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनस्तरावर 276 कर्मचारी तसा 27 राखीव अशा एकूण 303 कर्मचार्यांची कुमक लागणार आहे. तर कायदासुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस कर्मचार्यांची मदत घेतली जाणार आहे.

निवडणूकीदरम्यान लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन होवू नये यावर लक्ष ठेवण्यासाठी आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. संपूर्ण नगर परिषद क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याबरोबर या निवडणूकांच्या अनुषंगाने आचारसंहितेत बाधा येईल या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणूकीसाठी प्रचाराचा कालावधी 30 नोव्हेंबरपर्यंत रात्रौ 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
नामनिर्देशनपत्रे वेबसाईटवर दाखल करण्याचा कालावधी 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान दुपारी 2 पर्यंत देण्यात आला आहे. तर नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यासाठी या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत रविवार या सुट्टीच्या दिवशी वगळून कालावधी राहणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी आणि वैध अर्ज ठरविणे प्रक्रिया 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर छाननीनंतर अर्ज मागे घेण्याची मुदत अपिल नसेल तिथे 19 ते 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. अपिल असल्यास 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र 25 नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे. निवडणूक चिन्ह देणे व अंतिम उमेदवार यादी प्रसिध्द करणे 26 नोव्हेंबर रोजी मुदत आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत तर मतमोजणी व निकाल जाहीर करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. ही मतमोजणी नगरपरिषदेत केली जाणार आहे.