Saturday, May 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी नगर परिषदेची जुनी इमारत अखेर जमीनदोस्त 

रत्नागिरी नगर परिषदेची जुनी इमारत अखेर जमीनदोस्त 

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेची जुनी इमारत अखेर पाडण्यात आली आहे. अनेक दशकांपासून उभी असलेली ही इमारत केवळ एक प्रशासकीय केंद्र नव्हती, तर रत्नागिरीच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे साक्षीस्थान होती. नव्या इमारतीचे 1 मे महाराष्ट्र दिनी लोकार्पण करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. 

या इमारतीतूनच नगरपालिकेचे कामकाज दीर्घकाळ पार पडले. शहराच्या विकासाचे अनेक महत्त्वाचे निर्णय, धोरणे आणि योजना याच ठिकाणी आकाराला आल्या होत्या. त्यामुळे या वास्तूशी शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, माजी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला होता.

दरम्यान, जुन्या इमारतीच्या मागील बाजूस उभारण्यात आलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीतून आता नगर परिषदेचे कामकाज सुरू होणार आहे. विशेष बाब म्हणजे, नगर परिषद आपल्या स्थापनेच्या १५० व्या वर्षात प्रवेश करत असतानाच ही आधुनिक इमारत कार्यान्वित होत आहे.

नवीन इमारतीमुळे नागरिकांना अधिक जलद आणि सुसज्ज सेवा मिळतील, तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीतही अधिक गती आणि पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वाढत्या शहराच्या गरजांना प्रतिसाद देत रत्नागिरी आता आधुनिक प्रशासनाच्या दिशेने ठाम पावले टाकताना दिसत आहे.