Sunday, November 8, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी नगरपालिकेची ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये उत्तुंग कामगिरी; राज्यात चौथा क्रमांक पटकवला

रत्नागिरी नगरपालिकेची ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये उत्तुंग कामगिरी; राज्यात चौथा क्रमांक पटकवला

नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ११ नोव्हेंबरला होणार गौरव

रत्नागिरी:- केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ मोहिमेमध्ये रत्नागिरी नगरपालिकेने अव्वल कामगिरी करत राज्यपातळीवर मानाचा चौथा क्रमांक पटकावला आहे. शहराचे नैसर्गिक सौंदर्य, कचरा व्यवस्थापनाचे सुसूत्र नियोजन आणि रत्नागिरीकरांची स्वच्छताप्रियता यांच्या बळावर नगरपालिकेने हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे.

या ऐतिहासिक यशाचा गौरव सोहळा येत्या ११ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आला आहे. देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या शुभहस्ते रत्नागिरी नगरपालिकेचा विशेष सन्मान केला जाणार आहे. रत्नागिरीचा हा सर्वोच्च गौरव स्वीकारण्यासाठी नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे, उपाध्यक्ष समीर तिवरेकर आणि मुख्याधिकारी वैभव गारवे हे उपस्थित राहून राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारतील.

गेल्या काही वर्षांपासून नगरपालिकेने शहरात राबवलेली विविध स्वच्छता अभियाने, सुका व ओला कचरा वेगळा करण्याचे केलेले प्रभावी नियोजन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अहोरात्र कष्ट यामुळेच हे यश शक्य झाले आहे. नगरपालिकेच्या या प्रयत्नांना रत्नागिरीतील सुजाण नागरिकांनी दिलेल्या मोलाच्या साथीमुळे या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

राज्यस्तरावर चौथ्या क्रमांकावर मोहर उमटवून रत्नागिरीने राज्यातील इतर नगरपालिकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. दिल्लीत होणाऱ्या या गौरव सोहळ्यामुळे संपूर्ण रत्नागिरी शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे. “हे यश केवळ नगरपालिकेचे नसून प्रत्येक रत्नागिरीकराच्या स्वच्छतेप्रती असलेल्या बांधिलकीचे फलित आहे,” अशी भावना संपूर्ण रत्नागिरी परिसरातून व्यक्त केली जात आहे.