रत्नागिरी तालुक्यात महिला ठरवणार पुढाऱ्यांचे भविष्य

महिला मतदारांची संख्या सर्वाधिक, 5 फेब्रुवारीला मतदान

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात 10 जिल्हा परिषद आणि 20 पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 1 लाख 45 पुरुष मतदारांच्या तुलनेत 1 लाख 4 हजार 441 महिला मतदारांच्या संख्येमुळे या निवडणुकीत ‘महिला शक्ती’ कोणाच्या बाजूने कौल देते, हे पाहणे या होणाऱ्या निवडणूकीत औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रशासनस्तरावर 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा या ‘लोकशाहीच्या उत्सवा’साठी सज्ज झाली असल्यो निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

निवडणुकीचे सविस्तर कार्यक्रमासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. मात्र, 18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 22 जानेवारी रोजी प्राप्त अर्जांची छाननी केली जाईल, तर 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच मतदान 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत पार पडेल. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन 10 फेब्रुवारीपर्यंत नवनिर्वाचित सदस्यांची नावे अधिकृतरीत्या जाहीर केली जातील.

मतदानासाठी तालुक्यात एकूण 271 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘सखी’ मतदान केंद्रे, दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र केंद्रे आणि काही ‘आदर्श’ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंगच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी एकूण 707 कर्मचारी आणि अधिकाऱयीं फौज तैनात करण्यात आली आहे. यामध्ये 34 क्षेत्रीय अधिकारी, 298 मतदान केंद्राध्यक्ष आणि 281 मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संपूर्ण तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली निवडणूक अर्जांची छाननी उपविभागीय अधिकारी कार्यालयात होईल, तर मतमोजणी कुवारबांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडणार आहे. ईव्हीएम मशीनची तपासणी पूर्ण झाली असून, गरजेनुसार 110 टक्के यंत्रांची उपलब्धता प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आतापर्यंत 14 जणांनी 30 उमेदवारी अर्ज प्रशासनाकडून नेल्याची नोंद करण्यात आली आहे.