रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या चारही जागांवर शिवसेनेची सरशी

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात चार ग्रामपंंचायतीमध्ये चार जागांसाठी पोटनिवडणूक होऊन, यात शिवसेनेने चार जागांवर विजय मिळवत ठाकरे गटाला धक्का दिला. तालुक्यात ग्रामीण भागात ठाकरे गटाचे वर्चस्व असल्याचे बोलले जात असताना, हा निकाल शिवसेनेचा उत्साह वाढवणारा आहे.

रत्नागिरी तालुक्यामध्ये शिरगाव, निवळी, गोळप व मिर्‍या येथे पोटनिवडणूक लागली होती. गुरुवारी अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले होते. त्यामुळे कुणाच्या बाजुने निर्णय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये रत्नागिरी तालुक्यात काहीप्रमाणात शिंदे गटाने ठाकरे गटावर थोडक्यात मात दिली होती. मात्र काही मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाला धक्का बसला होता.

पोटनिवडणुकीत शिवसेनेने ठाकरे गटाला धोबीपछाड देण्यात यश मिळवले आहे. तालुक्यातील शिरगावसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच फरीदा काझी यांनी प्रभाग 1मध्येही विजय मिळवला होता. या सदस्यपदाचा राजिनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक लागली होती. याठिकाणी इम्तियाज अ. रहिमान मुजावर, सिध्देश चंदू खेत्री आणि हामजा हसन हुना यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. इम्तियाज मुजावर यांच्याकडून सरपंच फरीदा काझी व रज्जाक काझी यांनी पदाधिकारी जोरदार प्रचारात उतरले होते. तर शिवसेनेकडून मैदानात उतरलेल्या हामजा हुना यांच्याकडून उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, अजिम चिकटे व पदाधिकारी पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होते. शुक्रवारी मतमोजणी झाल्यावर इम्तियाज मुजावर यांना 236 तर विजयी उमेदवार हामजा हुना यांना 251 मते मिळाली. सिध्देश खेत्री याला 110 तर नोटाला 6 मते मिळाली. शिरगावमध्ये त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.

शिरगावप्रमाणेच गोळप ग्रामपंचायत निवडणूकही अटीतटीची होईल अशी अपेक्षा होती. परंतु शिवसेनेच्या रफिका बिलाल तांडेल यांनी 361 मते घेत साबीया असगर फणसोपकर यांचा एकतर्फी पराभव केला. फणसोपकर यांना अवघी 26 मते मिळाली. शिवसेना विभागप्रमुख नंदा मुरकर व त्यांच्या सहकार्‍यांनी या ठिकाणी पालकमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांच्या माध्यमातून नागरिकांपयर्ंत पोहचून आपले मत पटवून दिले. गोळपमध्येही सामंत यांचे वर्चस्व आहे.

निवळीमध्येही जोरदार रस्सीखेच दिसून आली. यात वैशाली विष्णू पवार यांनी 162 मते घेत अवघ्या चार मतांनी तन्वी निलेश सावंत यांचा पराभव केला. सावंत यांना 158 मते मिळाली तर नोटाला 13 मते मिळाली. मिर्‍या येथील निवडणूकही अटीतटीची झाली. याठिकाणी चौरंगी लढत पहायला मिळाली. यात गुरुप्रसाद सुभाष माने यांनी सर्वाधिक 160 मते घेत विजय मिळवला. तर विरोधात उभे राहिलेल्या राकेश शशिकांत सावंत याला 148, मकरंद दत्तात्रय सावंत याला 126 तर अजित विष्णू सावंत यांना 62 मते मिळाली. याठिकाणी नोटाला एकही मत मिळाले नाही. पोट निवडणुकीत चारही ग्रामपंचायतीत शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे.