Wednesday, May 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात वाहन खरेदी सुस्साट!

रत्नागिरी जिल्ह्यात वाहन खरेदी सुस्साट!

चार वर्षांत १ लाखाहून अधिक नवीन वाहने रस्त्यावर; एकूण वाहनसंख्या ५ लाखांच्या पार

रत्नागिरी:- कोकणातील निसर्गसंपन्न रत्नागिरी जिल्हा आता प्रगतीच्या महामार्गावर वेगाने धावू लागला आहे. गेल्या चार वर्षांत जिल्ह्याच्या वाहन संख्येत झालेली १ लाख ९ हजार ९०७ वाहनांची भर पडली आहे. रत्नागिरीकरांची बदलती जीवनशैली आणि आर्थिक विकासाचे निदर्शक ठरत आहे. आरटीओ कार्यालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण वाहनांचा आकडा आता ५ लाख ३३ हजारांच्या पुढे गेला आहे.

३१ मार्च २०२२ रोजी जिल्ह्यात ४ लाख २३ हजार ७३५ वाहने होती. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी वाहन खरेदीचा उत्साह वाढत गेल्याचे दिसून येते आहे. २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात २३,०५६ नवीन वाहने खरेदी करण्यात आली.
२०२३-२४ मध्ये २४,३९६ नवीन वाहने, २०२४-२५ मध्ये २७,९१५ नवीन वाहने आणि २०२५-२६: ३४,५४० नवीन वाहने खरेदी करण्यात आली.

दुचाकींचे वर्चस्व, स्कूटरची मोठी क्रेझ

​जिल्ह्यात नेहमीप्रमाणे दुचाकी वाहनांचे वर्चस्व कायम आहे. विशेषतः महिला चालकांची वाढती संख्या आणि शहरी भागातील सुलभ प्रवास यामुळे स्कूटरच्या विक्रीत मोठी तेजी आली आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत मोटार सायकलची संख्या २,२९,४४६ इतकी आहे. तर स्कूटर १,४०,२४० इतक्या आहेत. एका वर्षात १५,५५१ नवीन स्कूटर्सची नोंद करण्यात आली आहे.

चारचाकी आणि व्यावसायिक वाहने

आर्थिक सुबत्ता वाढल्याने कुटुंबाच्या सुरक्षित प्रवासासाठी कार खरेदीकडे कल वाढला आहे. २०२२ मध्ये ४८,९६२ असलेल्या कारची संख्या आता ६४,१७९ वर पोहोचली आहे. व्यावसायिक क्षेत्रातही २२,७२२ रिक्षा आणि १०,९३१ मालवाहू ट्रक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात धावत आहेत.

वाहनांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेत शहरांमधील रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. रत्नागिरी शहर, चिपळूण आणि खेड यांसारख्या व्यापारी केंद्रांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असून, भविष्यात सक्षम रस्ते विकास आणि वाहतूक नियोजनाची नितांत गरज निर्माण झाली आहे.