Saturday, May 9, 2026
spot_img
Home सामाजिक रत्नागिरी जिल्ह्यात रमजान ईदचा उत्साह

रत्नागिरी जिल्ह्यात रमजान ईदचा उत्साह

‘ईद-उल-फित्र’निमित्त सर्वत्र आनंदोत्सव

रत्नागिरी:- मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईद शनिवारी संपूर्ण जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेची पहिली नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. नवे कपडे परिधान करत सर्वांनी विविध स्थळांना भेटी देत आनंदोत्सव साजरा केला.

भाविकांच्या रमजान महिन्यातील शेवटचा रोजा शुक्रवार 20 मार्च रोजी ठेवण्यात आला.
ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधव महिनाभर सलग रोजे ठेवतात. ईदपूर्वी गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते. शुक्रवारी रोजा इफ्तार केल्यानंतर चंद्रदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
पहाटेच्या नमाज पठाणानंतर रमजान ईदची विशेष नमाज (ईद-उल-फित्र) अदा करण्यात आली. काही ठिकाणी इदगाह मैदानात तर काही ठिकाणी मुख्य मशिदीमध्ये ईदची नमाज अदा केली जाते. बहुतांश मशिदीमध्ये सकाळी 8 ते 9 या वेळेत नमाजचे आयोजन करण्यात आले होते. घरोघरी शिरखुर्मा बनवून नातेवाईक आणि मित्रमंडळींना याचे वाटप करत ईद सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली.
रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात सायंकाळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईद उत्साहात साजरी केली. अनेक घरांवर व प्रार्थनास्थळांवर विद्युतरोशनाई करण्यात आली होती. काही मोहल्ल्यांमध्ये पताका लावण्यात आल्या होत्या. विशेषत: ज्या लहान मुलांनी रमजानचे सर्व रोजे पूर्ण केले त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. शहरातील ईदगाच्या ठिकाणी तर मस्जिद मध्ये नमाज पठण करण्यात आले.