१२५ टायर प्राप्त ; आणखी १७५ टायरची गरज
रत्नागिरी:- अखेर येथील एसटीच्या विभागीय कार्यशाळेची टायरची प्रतीक्षा संपली आहे. कार्यशाळेला मागणी केलेल्या ३०० पैकी १२५ टायर प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कार्यशाळेत उभ्या असलेल्या ९० गाड्यांपैकी काही गाड्या सुरू होण्यास मदत होणार आहे. अजून १७५ टायरची एसटीला विभागाला गरज आहे.
एसटी विभागापुढील समस्या काही कमी होताना दिसत नाही. कोरोना महामारीमध्ये सुमारे दीड वर्षे एसटीची सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये एसटीचा तोटा आणखी वाढत गेला. एसटीला सावरण्यासाठी माल वाहतुकीचा पर्याय निवडावा लागला. माल वाहतुकीतून एसटीने सुमारे सव्वा दोन कोटीचा नफा मिळविला. सार्वजनिक वाहतूक सुरळीत होत असताना पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलिनीकरणासह अन्य मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे एसटी विभाग आणखी आर्थिक तोट्याच्या खाईत लोटला गेला. संप मागे घेतल्यानंतर कर्मचारी हजर झाले. नवीन शैक्षणिक वर्षे सुरू झाले. एसटीच्या साडेचार हजार फेऱ्यापैकी साडेतीन हजारावर फेऱ्या सुरू झाल्या. मात्र त्यातही विघ्न आले ते टायरच्या तुटवड्याचे. एसटीच्या विभागीय कार्यशाळेत ९० गाड्या टायर नसल्याने उभ्या होत्या. सार्वजनिक वाहतूक पूर्वपदावर येत असल्याने एसटीला मागणी वाढली आहे. त्याता शाळा सुरू झाल्यामुळे फेऱ्यांची मागणी वाढली आहे. परंतु एसटीकडे गाड्या उपलब्ध नसल्याने ही मागणी पूर्ण करता येत नाहीत. ९० गाड्यांसाठी कार्यशाळेला ३०० टायरची गरज आहे. त्याची मागणी करण्यात आली होती. परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. प्रसारमाध्यमांनी हा विषय उचलून धरल्यानंतर एसटीला १२५ टायर प्राप्त झाले आहेत. या टायरमुळे काही गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.