Thursday, July 30, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरीसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याकडून ३०-४० किमी वेगाने वादळी वाऱ्यांचा अंदाज

रत्नागिरी:- भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा महत्त्वाचा पावसाचा अंदाज जारी केला आहे. २८ जुलैपासून पुढील तीन ते चार दिवस रत्नागिरीसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८ ते ३० जुलै दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ३१ जुलै रोजीही मुसळधार पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर १ ऑगस्टपासून पावसाची तीव्रता कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रत्नागिरीसोबतच संपूर्ण कोकण विभागात पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर आणि मुंबई परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

पावसाच्या या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. किनारपट्टीवर वादळी हवामान आणि समुद्रात लाटांचा जोर राहणार असल्याने मच्छीमारांनी तसेच पर्यटकांनी समुद्रात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. विजा चमकत असताना मोकळ्या जागेत, शेतात किंवा मोठ्या झाडांखाली आश्रय घेऊ नये; तसेच विजेची उपकरणे बंद ठेवावीत. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तयार पिकांची लवकरात लवकर काढणी करावी, तसेच शेतात साचणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होईल याची व्यवस्था करावी असे सांगण्यात आले आहे.