रत्नागिरी:- महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने दोन दिवसीय रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव, 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, रत्नागिरी येथे शनिवार 3 व रविवार 4 डिसेंबर रोजी हा ग्रंथोत्सव होणार आहे.
जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. डॉ. श्री. सुरेश जोशी, ज्येष्ठ साहित्यिक हे उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, पोलिस अधिक्षक, धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथ प्रेमी, वाचक, अभ्यासक, संशोधक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने ग्रंथोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या साहित्यिकांच्या मांदियाळीमध्ये विविध विषयांवर व्याख्याने, परिसंवाद व काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव, २०२२ मध्ये ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये शासकीय ग्रंथागार, साहित्य अकादमी, दिल्ली व मुंबई, नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली व मुंबई, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, कोल्हापूर शाखा आणि पुण्यातील प्रकाशक व विक्रेते यांची ग्रंथ दालने लावण्यात येणार आहेत. या ग्रंथ प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे उद्घाटन ग्रंथोत्सवाचे पहिल्या दिवशी 3 डिसेंबर ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. शनिवार 3 डिसेंबर पासुन सुरु होणाऱ्या ग्रंथोत्सवाचे सुरुवातीस सकाळी 8 वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर ग्रंथ दिंडी जी. जी. पी. एस. हायस्कूल,रत्नागिरी येथुन निघणार असून शासकीय रुग्णालय, मार्गे रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, जयस्तंभ, रत्नागिरी येथे येईल. अनेक मान्यवर व्यक्ती, शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि ग्रंथ प्रेमी मोठ्या संख्येने ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. ग्रंथदिंडीचे उद्घाटन ग्रंथ पूजनाने जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचे शुभहस्ते होणार आहे.
शनिवार 3 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” उपक्रमांतर्गत इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. रमेश कांबळे यांचे “स्वातंत्र्य लढ्यातील कोकण” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3.30 वाजता “स्मरण शतायुंचे” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, मराठी साहित्यात मोलाचे योगदान देणाऱ्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, गंगाधर गाडगीळ, वसंत बापट, कवी शंकर रमाणी कवयित्री शांताबाई शेळके या थोर साहित्यिकांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. राजेंद्रप्रसाद मसूरकर, अरविंद कुलकर्णी, प्रकाश देशपांडे, मदन हजेरी व शिवराज गोपाळे हे या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत.
रविवार 4 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता “स्पर्धा परीक्षा एक सुवर्ण संधी” या विषयावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, राकेश गिड्डे, अंकिता लाड, श्रध्दा चव्हाण, प्रतिक आढाव हे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2.30 वाजता “ग्रंथालये: वाचक व बदलती वाचन माध्यमे” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये डॉ. रामदास लिहीतकर, अॅड. दीपक पटवर्धन, प्रा. संतोष चतुर्भुज आणि मनोज मुळ्ये हे सहभागी होणार आहेत. या दोनही सत्रांमध्ये रत्नागिरी शहर व परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. प.तथा सदस्य जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समिती यांनी केले आहे. रविवार 4 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता निमंत्रित कवींचे काव्य संमेलन व तद्नंतर समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रीमती नमिता कीर, कोकण मराठी साहित्य परिषद,रत्नागिरी शाखा या काव्य संमेलन व समारोपाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत.









