रत्नागिरीत १५ रोजी ‘जनआक्रोश रॅली’

रत्नागिरी:- शहरात बुधवार १५ ऑक्टोबर रोजी भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशाल जनआक्रोश रॅलीचे (मोर्चाचे अंतर्गत) आयोजन करण्यात आले आहे. ‘चलो रत्नागिरी’ या हाकेला प्रतिसाद देत सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (सिव्हिल हॉस्पिटल) येथून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काढली जाणार आहे.

या रॅलीच्या आयोजनामागे अनेक महत्वपूर्ण विषय असून यामध्ये ‘ईव्हीएम हटाव, बॅलेट लाव, देश बचाव’ ही मुख्य मागणी आहे. ओबीसींसाठी जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, यावर जोर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे आदिवासींवरील अन्याय, मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेसाठी व मॉब लिंचिंगच्या विरोधात आवाज उठवणे आणि एससी, एसटी, ओबीसी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी प्रमुख आहे. या व्यतिरिक्त महाबोधी महाविहार मुक्तीचा विषयही अजेंड्यावर आहे. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा निमंत्रक म्हणून बामसेफ जिल्हाध्यक्ष समाधान पैठणे, भारत मुक्ती मोर्चा कोकण प्रदेश संयोजक शर्मिष्ठा पवार, भारत मुक्ती मोर्चाचे विजय जाधव, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हाध्यक्ष संजय आयरे आणि भारत मुक्ती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम हे कार्यरत आहेत. विविध समाजाच्या व संघटनांच्या मागण्यांना एकत्रित स्वरूप देत हा मोर्चा रत्नागिरीच्या रस्त्यांवरून निघणार आहे. या रॅलीला भीम आर्मी व बहुजन मुक्ती पार्टीचा जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.