Wednesday, May 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी; पहिल्याच दिवशी २६ किलो पिशव्या जप्त

रत्नागिरीत प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी; पहिल्याच दिवशी २६ किलो पिशव्या जप्त

रत्नागिरी:- शहरामध्ये भाजी, मटन, मच्छीसह सर्वच ठिकाणी किरकोळ साहित्यासाठी प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर मोठ्याप्रमाणात होत असून, त्यामुळे कचऱ्यात प्लॅस्टीक पिशव्यांचे प्रमाण धोकादायक पध्दतीने वाढले आहे. त्यामुळे शहरात प्लॅस्टीक पिशव्या वापरावर बंद घालण्यात आली असून, प्लॅस्टीक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. पहिल्याच दिवशी व्यावसायिकांमध्ये जागरुकता निर्माण करतानाच तब्बल 26 किलोहून अधिकच्या पिशव्या नगर पालिका कर्मचाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिली.

शहरामध्ये सर्वच दुकानांमधून प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर सर्ऱ्हास होताना दिसत आहे. किरकोळ भाजी, मटन, मासळी विक्रेत्यांकडेही पिशव्या वापरल्या जातात. त्यामुळे कचऱ्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्यांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात आढळत आहे. अगदी कचरा टाकतानाही याच प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर होताना दिसत असून, नागरिक प्लॅस्टीक कचऱ्यासह रस्त्यावर, गटारात बिनधास्त टाकत आहेत. त्यामुळे गटारे चोकअप होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

रनपला दिडशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टीक बंदीची मोहीम शहरात जोरात राबवण्यात येणार आहे. पहिले आठ दिवस नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सूचना दिल्या जाणार आहेत. त्यानंतर थेट कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. ज्या व्यावसायिकांकडे प्लॅस्टीक पिशव्या मिळतील त्यांच्यावर पहिल्यावेळी पाच हजाराचा दंड, दुसऱ्यावेळी दहा हजार तर तिसऱ्यावेळी पंधरा हजाराचा दंड आकारला जाणार आहे. चौथ्यावेळी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
बुधवारी मोहीमेच्या पहिल्याच दिवशी तब्बल 48 ठिकाणी दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 26 किलो 500 ग्रॅम एवढया पिशव्या मिळून आल्या. या पिशव्या नगर पालिका पथकाने जप्त केल्या आहेत. सध्या कचरा गाडीवरुन नागरिकांनाही सूचना दिल्या जात आहेत. रत्नागिरी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त नगर पालिका स्वच्छता कर्मचारी, नगरसेवक यांची नसून शहर व परिसरातील नागरिकांचीही आहे. त्यामुळे नागरिकांनीही स्वत:हून प्लॅस्टीक मुक्त मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी केले आहे.