रत्नागिरीत परिवर्तनाची नांदी सुरू झालीय: बाळ माने

रत्नागिरी:- प्रवाशांची गर्दी झाली की बोट बुडण्याच्या धोका असतो तशी अवस्था महायुतीची झाली आहे. महायुतीची बोट ओव्हरलोड झालीय. ती केव्हाही बुडण्याची शक्यता आहे. महायुतीच्या कारभाराला इथले नागरिक वैतागले आहेत. 99 किलोमीटरच्या पदयात्रेत अनेक समस्या नागरिकांनी स्वतः मांडल्या आहेत आणि इथूनच परिवर्तनाची नांदी सुरू झाली असल्याचे माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हॉटेल व्यंकटेश येथे आयोजित पत्रकार परिषदेत तर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश किर, माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी माने यांच्यासह बसपा, आरपीआय, वंचित आघाडी आणि मनसे चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शहरात 2 नोव्हेंबर पासून आपण परिवर्तन पदयात्रेला सुरुवात केली. नऊ दिवसात शहरात 99 किमी चा प्रवास या पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी शहरातील रस्त्यांची दुर्दशा, स्वच्छ भारत अभियानाची वाताहत, पाण्याची समस्या, मोकाट गुरांचा प्रश्न असे अनेक प्रश्न नागरिकांनी भेटून सांगितल्या. बदल घडवण्यासाठी महायुतीचे 32 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि एक नगरध्यक्ष पदासाठीचा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. जनतेने परिवर्तन करण्याचा निश्चय केला असून यावेळी महाविकास आघाडीला शंभर टक्के यश मिळणार असा विश्वास बाळ माने यांनी यावेळी व्यक्त केला.

शहरात सर्वात मोठा प्रश्न निकृष्ट दर्जाचे रस्ते हाच आहे. 44 कोटींचं डांबर वापरलं न गेल्यानेच रस्त्यांचा दर्जा घसरला आहे आणि याचाच त्रास रत्नागिरीकराना सहन करावा लागत आहे. निवडणुकीपूर्वी 44 कोटींची व्हाउचर जनतेला दाखवा असे आव्हान माने यांनी यावेळी दिले. निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाल्यानंतर पुढील सहा महिन्यात रस्ते चकाचक करू. होणाऱ्या रस्त्यांना वर्षा दोन वर्षांची नाही तर दहा वर्षांची डीएलपी असेल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

बाळ माने यांनी मांडलेल्या भूमिकेला महाविकास आघाडीमधील सर्व सहभागी पक्ष सहमत आहेत. रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीत एकसंघ काम करून दणदणीत विजय मिळवू असा विश्वास यावेळी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी व्यक्त केला.