रत्नागिरी:- विजयदुर्ग येथील समुद्रात २७ सप्टेंबरला सकाळी महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमाचे उल्लंघन करत ३ वाव पाण्यात अवैध पर्ससीन मासेमारी (विशिष्ट पद्धतीच्या जाळ्याने मासे पकडण्याची आधुनिक पद्धत) करतांना रत्नागिरी येथील नौकामालक अर्शद लतीफ पावसकर यांची नौका जप्त करण्यात आली. नौकेची तपासणी केली असता त्यात एकूण २० परप्रांतीय खलाशी आढळून आले.
दुसर्या घटनेत २८ सप्टेंबर या दिवशी तारामुंबरी आणि कुणकेश्वर येथील समुद्रात अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करणारी रत्नागिरी येथील ‘इब्राहिम युसूफ’ ही नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्यांनी जप्त करून देवगड बंदरात आणली. या नौकेत एकूण २० परप्रांतीय खलाशी आढळून आले.
साहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड येथील अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी सुरक्षारक्षकांच्या साहाय्याने उपरोक्त दोन्ही नौकांवर कारवाई केली. या वेळी या नौकांनी महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम, १९८१ च्या तरतुदींचे उल्लंघन करत अवैध पद्धतीने मासेमारी केल्याचे निष्पन्न झाले. अधिनियमांतर्गत तात्काळ कायदेशीर कार्यवाही चालू करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले. ४-५ दिवसांपूर्वीच परवाना अधिकार्यांनी एका पर्ससीन नौकेवर कारवाई केली होती. त्यामुळे गेल्या ४-५ दिवसांत एकूण ३ पर्ससीन नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक पारंपरिक रापण संघाने यापूर्वी परवाना अधिकार्यांना निवेदन देऊन अवैध पर्ससीन मासेमारीविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर ३ नौकांवर कारवाई करण्यात आल्याने स्थानिक मासेमारांनी समाधान व्यक्त केले आहे.
२८ सप्टेंबर या दिवशी देवगड येथील ‘हरिकृपा-१’ ही नौका अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करत होती. या नौकेवर कारवाई करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाची नौका येत असल्याचा सुगावा लागताच ‘हरिकृपा-१’ या नौकेने तेथून पळ काढला. या नौकेवरही महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमाच्या अंतर्गत योग्य ती कारवाई करणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.









