वन, पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक घेतली. शहरात यंत्रणा पूर्णपणे कार्यरत असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही मात्र प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.
सोशल मीडियावर फिरणारे व्हिडिओ आणि विश्वनगरमध्ये झालेला कथित हल्ला यावर ना. सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, संदेश करगुटकर यांच्या घरासमोर रात्री २ वाजता कुत्रा भुंकल्याने सीसीटीव्ही तपासण्यात आला. फुटेज झूम करून पाहिले असता, तो बिबट्याच आहे याची अद्याप तांत्रिक खात्री पटलेली नाही. तसेच, विश्वनगरमध्ये कोणताही हल्ला झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये. बिबट्याचा शोध घेण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात सावंत यांची बाग (विश्वरत्न नगर परिसर), करगुटकर यांच्या घराचा परिसर, गगनगिरी स्वामी मठ परिसर आणि वनविभागाच्या सूचनेनुसार सोयीचे चौथे ठिकाण या चार ठिकाणी पिंजरे लावण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात साधारणपणे १०० ते ११० बिबट्यांचा वावर असून, सह्याद्रीच्या जंगलात एक पट्टेरी वाघ असल्याची माहितीही ना. सामंत यांनी यावेळी दिली. सध्या रत्नागिरी शहराच्या २५ किमी परिघात वनविभागामार्फत ठसे तपासणी आणि ‘डॉग स्क्वॉड’च्या मदतीने शोधमोहीम राबवली जात आहे.
.









