रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्येमधील रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात आता जप्तीसाठी जिल्हा न्यायालयाकडून २५ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. संबंधित रिसॉर्ट मुदतीआधीच जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आल्याने झालेली नुकसान भरपाई जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी अथवा त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आले होते. यानंतर ४ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने तत्काळ स्थगिती मिळवली. आता ही स्थगिती आणखी काही दिवस वाढवण्यात आली आहे.
शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील रत्नसागर रिसॉर्ट ‘मे २०२१ मध्ये जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आले होते. मुदतीआधीच रिसॉर्ट बंद केल्याने संबंधित मालक प्रतापसिंह सावंत यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. अचानक रिसॉर्ट बंद झाल्याने सावंत यांची ९ कोटी २५ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाने द्यावी, असे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आल्याचे सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ४ एप्रिल २०२५ रोजी शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास संबंधित प्रकरणाचे आदेश घेवून कोर्टाचे २ कर्मचारी व तक्रारदार सावंत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या आदेशासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आली होती, असेही यावेळी सांवत यांनी सांगितले.
न्यायालयाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशानुसार नुकसानभरपाई द्यावी अन्यथा त्यांच्या कार्यालयातील सामान जप्त करण्याच्या आदेशानुसार कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुर्च्या आणि संगणक बाहेर काढले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. संबंधित कारवाईसंदर्भात तत्काळ स्थगिती मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. ही कार्यवाही पुढे १६ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. या संदर्भात ११ जून रोजी जिल्हा न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाकडून २५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.