रत्नागिरी:- केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वत्र निवडणूक ज्वर पाहायला मिळत असून इच्छुक नेतेमंडळींना गुदगुल्या होऊ लागल्या आहेत, तर कार्यकर्त्यांना उकळ्या फुटत आहेत. रखडलेल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, नगरपंचायतीच्या निवडणुकांचेही आता बघा की, असा सूर इच्छुकांमधून आळवला जात आहे.
पाच राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील निवडणुकांचा बिगुल वाजेल, अशा आशा आता पल्लवित झाल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकींची घोषणा केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत या राज्यांमध्ये राजकीय फटाके चांगलेच फुटणार आहेत. असे असले तरी या निवडणुका जाहीर झाल्यामुळे गावागावातही उकळ्या फुटू लागल्या आहेत. आता आपल्या निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार? असा प्रश्न आता इच्छुकांना पडू लागला आहे. सध्या जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीवर गटविकास अधिकारी तर नगरपालिकेवर मुख्याधिकारी प्रशासक म्हणून कामकाज पहात आहेत. मार्च 24 पर्यंत प्रशासक राहणार का? त्या आधी निवडणुकांचे पडघम वाजणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी गावोगावी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असणार्या संभाव्य उमेदवारांनी स्वतःच्या निवडणुकीचा मार्ग सुकर होण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालून गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सलगी वाढवण्याचा प्रयत्न या ना त्या कारणाने सुरू केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची साखर पेरणी इच्छुक दसरा दिवाळी सणाच्यानिमित्ताने करणार की काय? असा प्रश्न पडला आहे.