रत्नागिरीः कोरोना व्हायरसने माणसाला माणुसकी विसरायला लावल्याची अनेक उदाहरणे समोर आली. मृत्यूनंतरदेखील नातेवाईकांनी अंतिम संस्कार करण्यास नकार दिल्याने काहीजणांचे पार्थिव अंत्यसंस्काराकरिता ताटकळत राहिले. अशावेळी रक्ताच्या नात्यांपेक्षा कामाला आले ते अनोळखी खांदे. नातेवाईक असूनहि आज पालिका कर्मचारी कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करत आहेत. ज्यावेळी नातेवाईक स्मशानभुमितहि यायला तयार होत नाहीत अशावेळी स्वतः जोखीम घेऊन रनप आणि आणि जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी 27 जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. परंतु काही रुग्ण मात्र उपचाराला प्रतिसाद देत नाहीत आणि त्यांचा मृत्यू होतो. कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी यायला नातेवाईक तयार होत नाहीत. आई-वडीलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुले घाबरत आहेत. परंतु पालिका, जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करत आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयातून कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर हे कर्मचारी सज्ज होतात.
तेरा जणांच्या दोन पथकांमार्फत अंत्यविधी केले जातात. मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना कर्मचारी स्वतःच्या सुरक्षेसाठी लागणारे पीपीई कीट परिधान करतात. रुग्णवाहिकेमधून मृतदेह आल्यानंतर स्ट्रेचरवरुन मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो. मृतदेहाचे दफन करण्यासाठी सात ते आठ फुट खोल, अडीच फुट रुंद अशा प्रकारे खड्डे काढून त्यामध्ये मृतदेहाचे दफन केले जाते. त्यानंतर पीपीई कीट तेथेच जाळले जातात. मार्चपासून जुलैपर्यंत २७ मृतदेहांचे दफन,दहन करण्यात आले आहे.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर घरी गेल्यानंतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातात. निर्जंतुकीकरण केल्यानंतरच कुटुंबात जात असल्याचे या कर्मचार्यानी सांगितले. आरोग्य निरीक्षक आरिफ शेख, संदेश कांबळे, किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितम कांबळे, दिनेश जाधव, मनोहर कदम, संजय मकवाना, प्रभाकर कांबळे, ज्ञानेश कदम, योगेश मकवाना, योगेंद्र जाधव, विशाल राठोड, बबन बेटकर, संदिप सावंत हे दोन पथकांच्या माध्यमातून कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.









