यंदाच्या हंगामात केवळ 30 टक्केच काजू उत्पादन

रत्नागिरी:- जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सरासरीच्या 30 टक्केच उत्पादनाचा अंदाज आहे. उत्पादन कमी असले तरी काजू बीचा दर 110 रुपयांवरच स्थिर आहे. यापुढे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नसल्याचे व्यापार्‍यांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात या वर्षी जानेवारीपासून काजू हंगामाला प्रारंभ झाला. किनारपट्टी भाग आणि दोडामार्ग तालुक्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तर इतर भागांत जानेवारीच्या अखेरीस हंगाम सुरू झाला.

या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये थंडीचा अभाव होता. त्यामुळे अपेक्षित पालवी आणि मोहोर आला नाही. जानेवारीत थंडी पडल्यानंतर झाडांना पालवी आणि मोहर आला. त्यामुळे प्रथमच काजू हंगामाची तीन टप्प्यांत विभागणी झाली. पहिल्या, दुसर्‍या टप्प्यातील काजू हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे तर तिसर्‍या टप्प्यातील हंगामदेखील पुढील दहा, बारा दिवसांत आटोपण्याची शक्यता आहे. काजूच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. काजू बीचा दर प्रतिकिलो केवळ 110 रुपयांवरच राहिला आहे. उत्पादन कमी असल्यामुळे काजू बीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. परंतु, दरात वाढ होत नसल्याने आता उत्पादक काजू बीची विक्री करू लागले आहेत. शासनाने काजूसाठी अनुदानासहीत 130 रुपये दर निश्चित केला आहे. ही दरवाढ फसवी असल्याचा आरोप आता बागयतदरांनी केला आहे. तसेच ही दरवाड निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर लागू होणार असल्याने तकलादू असल्याचे बागायतदराचे म्हणणे आहे.