शाहू फुले आंबेडकर मंचाचे प्रतिनिधी अभिजित हेगशेट्ये यांचा थेट आरोप
रत्नागिरी:- “हा मोर्चा कोणा एका विशिष्ट नेत्याच्या किंवा मंत्र्यांच्या विरोधात नव्हता. शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेला आरोप म्हणजे वास्तविक पाहता मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनाच अडचणीत आणणारा प्रकार आहे. या मोर्च्याला मंत्र्यांच्या विरोधातील आंदोलन म्हणून रंगवण्याचा चुकीचा प्रयत्न केला जात असून, संपूर्ण मोर्च्यात कोणाचेही नाव घेण्यात आलेले नव्हते. आमचे आणि सामंत साहेबांचे संबंध चांगले आहेत. हा मोर्चा केवळ दिल्लीतील आंदोलक मुलांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी होता आणि या विषयाला राजकीय वळण देणे म्हणजे तरुणांच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे,” असे स्पष्ट मत शाहू फुले आंबेडकर मंचाचे प्रतिनिधी अभिजित हेगशेट्ये यांनी व्यक्त केले.
मोर्च्याची माहिती देण्यासाठी आयोजित या पत्रकार परिषदेला मंचाचे बशीर मुर्तुंझा, राजू जाधव आणि रविंद्र कोकरे हे मान्यवर उपस्थित होते. जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या मुलांवर झालेल्या लाठीमारामुळे रत्नागिरीतील तरुणांमध्ये प्रचंड नाराजी होती, तसेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे हा या मोर्च्याचा मुख्य उद्देश होता, अशी माहिती त्यांनी दिली.
तरूणांचा उत्स्फूर्त आणि ऐतिहासिक प्रतिसाद
अवघ्या ३६ तासांच्या नियोजनात या मोर्च्याला रत्नागिरीच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रतिसाद लाभला. सोशल मीडियाच्या माध्यमातून २५ ते ३० मुलांनी स्वतःचे व्हिडिओ बनवून लोकांना आवाहन केले होते. मंचाने केवळ ५०० ते ६०० लोक येतील असा अंदाज वर्तवला होता, मात्र पोलिसांनी मोर्च्यात ८,००० पेक्षा जास्त लोक असल्याचा आकडा दिला आहे. या मोर्च्यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर महाविद्यालयांतील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक प्राध्यापक तर व्यवस्थापनाच्या चौकशीची भीती बाजूला ठेवून, स्वतःची रजा टाकून या आंदोलनात सामील झाले होते.
नागरिकांचे आणि प्रशासनाचे आभार
मोर्च्यादरम्यान वाहतूक कोंडी सहन करावी लागूनही रत्नागिरीकरांनी दाखवलेला संयम आणि चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे हेगशेट्ये आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विशेष आभार मानले.









