रत्नागिरी:- अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीसह पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या इशार्यामुळे मच्छीमारीही ठप्प झाली आहे. शनिवारी (ता. 30) जिल्ह्यातील नौका बंदरातच उभ्या होत्या. पावसासह वादळाचा प्रभाव दोन दिवस राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवस मासेमारीला ब्रेक लागणार आहे.
शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 12.44 मिलिमिटर पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड 5, दापोली 42, खेड 16, गुहागर 23, चिपळूण 15, संगमेश्वर 6, रत्नागिरी 2, लांजा 1, राजापूर 2 मिमि नोंद झाली आहे. 1 जुनपासून आतापर्यंत 3064 मिमि पाऊस झाला आहे.
मागील आठवडाभर जिल्ह्यात थांबूनथांबून सरी पडत आहेत. शुक्रवारी रात्री वेगवान वार्यासह जोरदार पाऊस झाला. सुमारे अर्ध्यातासाहून अधिक काळ जोर होता. शनिवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. दिवसभरात एखादी सर पडून गेली; मात्र सायंकाळी वार्यासह पावसाला सुरवात झाली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पावसाला सुरुवात झाली असून याचा जोर दोन दिवस राहणार आहे.
केरळसह गोवा राज्याच्या किनारी भागात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला नसला तरीही खोल समुद्रात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरीतील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणार्या मिरकरवाडा येथील नौका बंदरातच उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. एकही नौका आज बाहेर पडली नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले. वादळाचा प्रभाव उद्या दुपारपर्यंत राहणार आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर मासेमारी बंद राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वातावरण बिघडलेले असले तरीही काही मच्छीमारी नौका किनारीभागात मासेमारीला बाहेर पडल्या होत्या. त्यांना काहीप्रमाणात लेप मासा सापडला आहे. मागील आठवडयात बहूसंख्य मच्छीमारांना उष्टी बांगडी मिळत होती. फिशमिलमध्ये 32 किलोला 800 रुपये दराने खरेदी सुरु आहे. किलोचा दर 25 रुपये आहे. पंधरा दिवसांपुर्वी किलोचा दर 12 ते 15 रुपयांवर आला होता.
अतिपावसामुळे भातपिक धोक्यात
सप्टेंबरच्या अखेरीस पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. सलग पडत असलेल्या पावसामुळे भात पिकांना धोका होऊ शकतो. पावसाचे पाणी प्रमाणापेक्षा अधिक भात शेतात साचून राहिले तर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पावसामुळे दाणे भरलेली रोपं खाली पडून जाऊ शकतात, अशी भिती शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे.









