मुसळधार पावसामुळे संगमेश्वरात तीन दुकाने सोनवी नदीमध्ये कोसळली

३ लाखांचे अंदाजित नुकसान

संगमेश्वर:- संगमेश्वर-देवरुख मार्गावरील संगमेश्वर बस स्थानकाजवळील दुकानांचा नदीकाठचा भाग मुसळधार पावसामुळे खचल्याने तीन दुकाने कोसळली. या दुर्घटनेत सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेत बाबासाहेब प्रभावळे यांच्या ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट्स दुकानाचे अंदाजे १ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अजय निवळकर यांच्या टीव्ही रिपेरिंग दुकानासह दिलीप हरी जोशी यांच्या फोटो स्टुडिओलाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे.

दरम्यान, या भागातील इतर दुकानेही धोकादायक अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.