दापोली:- मुंबईला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या मुरुड येथील एका २७ वर्षीय तरुणाचा तलावात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे साऱ्यांना धक्का बसला आहे.
प्रसाद अनंत बांद्रे (वय २७, रा. मुरुड भैरीचा कोंड, ता. दापोली) असे या तरुणाचे नाव आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद बांद्रे हा १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सातच्या सुमाराला मुंबईला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तब्बल दहा दिवस उलटूनही त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुरुड भैरीचा कोंड येथील तलावाच्या पाण्यावर एक मृतदेह तरंगताना ग्रामस्थांनी पाहिला. ग्रामस्थांनी खात्री केली असता तो मृतदेह बेपत्ता असलेल्या प्रसाद बांद्रे याचा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. या प्रकरणी दापोली पोलिस स्थानकात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईला जाण्यास निघालेला हा तरुण गावातीलच तलावात कसा पोहोचला आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू कसा झाला, याचा तपास पोलिस करत आहेत.









