Saturday, May 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून जिल्ह्यात 109 रुग्णांना थेट लाभ

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून जिल्ह्यात 109 रुग्णांना थेट लाभ

75 लाख 90 हजारांचा निधी वितरित

रत्नागिरी:- गंभीर आजारपण आणि उपचाराच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ योजना खऱ्या अर्थाने संकटमोचक ठरली आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून अविरत प्रयत्न केले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून या निधीसाठी प्राप्त झालेल्या १६१ अर्जांपैकी तब्बल १०९ रुग्णांना थेट आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला असून, एकूण ७५ लाख ९० हजार रुपयांचा निधी उपचारासाठी वितरित करण्यात आला आहे.

वर्गवारीनुसार मदतीचे पारदर्शक वाटप
या योजनेअंतर्गत आजाराचे गांभीर्य आणि उपचाराचा होणारा खर्च लक्षात घेऊन अत्यंत पारदर्शक पद्धतीने रुग्णांना वर्गवारीनुसार आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ३१ रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे एकूण ३१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. ४८ रुग्णांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण २४ लाख रुपयांचा दिलासा मिळाला. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या उपचारांसाठी २ रुग्णांना प्रत्येकी २ लाख रुपये (एकूण ४ लाख) मंजूर करण्यात आले.

५ रुग्णांना प्रत्येकी ८० हजार रुपये (एकूण ४ लाख), ४ रुग्णांना प्रत्येकी ७५ हजार रुपये (एकूण ३ लाख), ६ रुग्णांना प्रत्येकी ७० हजार रुपये (एकूण ४.२ लाख), ३ रुग्णांना प्रत्येकी ६० हजार रुपये (एकूण १.८ लाख), ४ रुग्णांना प्रत्येकी ४० हजार रुपये (एकूण १.६ लाख), ३ रुग्णांना प्रत्येकी २५ हजार रुपये (एकूण ७५ हजार) आणि याशिवाय प्रत्येकी एका रुग्णाला अनुक्रमे ९० हजार, ३५ हजार आणि ३० हजार रुपयांची विशेष आर्थिक मदत कक्षाकडून मिळवून देण्यात आली.

कक्षाच्या प्रतिनिधींचे अहोरात्र प्रयत्न
सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्णांना कागदपत्रांच्या तांत्रिक प्रक्रियेचा त्रास होऊ नये आणि ही मदत थेट व लवकरात लवकर संबंधित रुग्णालयांपर्यंत पोहोचावी, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रतिनिधी विशेष काळजी घेत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील या शेकडो रुग्णांपर्यंत आणि त्यांच्या कुटुंबांपर्यंत आरोग्याचा हा मोठा आधार पोहोचवण्यात डॉ. जिज्ञा लाखाटे, श्रीमती अनिता पवार, श्री अमित कोरगावकर आणि श्री राजेश आंबेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या विशेष पाठपुराव्यामुळेच रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य झाले आहे.