मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी रत्ननगरी सज्ज

रत्नागिरी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी सज्ज झाली आहे. साळवी स्टॉप पासून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे मोठमोठे पोस्टर्स शहरात झळकावण्यात आले असून शहरातील दुभाजकावर भगवे झेंडे देखील फडकवण्यात आले असून संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सोबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, बंदर व खानिकर्म मंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार आदी मंत्री देखील रत्नागिरीत दाखल होत आहेत. रत्नागिरीतील उभारण्यात आलेल्या पहिल्या तारांगणाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी ८०० कोटींच्या विकासकामांचे एकाचवेळी शुभारंभ होणार आहे.

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप पासून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर झळकवण्यात आले आहेत. रस्त्यांवरील दुभाजकांवर भगवे झेंडे फडकवन्यात आले आहेत. यामुळे शहरातील वातावरण देखील भगवेमय झाले आहे. शहरातील महापुरुषांच्या पुतळा परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या – ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या – त्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे.