मुंबई-गोवा महामार्गावर बावनदीजवळ डंपर अपघात

चालक किरकोळ जखमी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील बावनदी येथील उताराजवळ डंपरचा अपघात झाला. या अपघातात. चालक किरकोळ जखमी झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

अलगुराय (वय ४०, रा. पाटणा, बिहार, पुर्ण नाव माहित नाही ) असे किरकोळ जखमी झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २२) पहाटे साडेचारच्या सुमारास बावनदी येथील उतारात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अलगुराय हा डंपर (क्र. एमएच ४३ वाय ५९९८) घेऊन तालुक्यातील जयगडहून मुंबईकडे कोळसा घेऊन जात होता. बावनदी येथील उतारावरील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे डंपर रस्त्याच्या डाव्या बाजूच्या उतारावर जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक अलगुराय हा किरकोळ जखमी झाला. उपचारासाठी त्याला तात्काळ जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, वेळीच उपचार झाल्यामुळे चालकाचे प्राण वाचले आहेत. अपघातानंतरही महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. घटनास्थळी हातखंबा पोलिस मदत केंद्र व ग्रामीण पोलिस रत्नागिरी येथील अधिकारी कार्यरत होते. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत