रत्नागिरी:- तालुक्यातील मौजे मिरजोळे, लक्ष्मीकांत वाडी येथे शुक्रवारी सकाळी एका बिबट्याची मादी जाळीत अडकल्याची घटना उघडकीस आली. वनविभागाने तत्परता दाखवत या बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिरजोळे येथील लक्ष्मीकांत वाडीतील कोलगे किराणा दुकानाजवळ असलेल्या लाकडाच्या माचाखालील जाळीत एक बिबट्या अडकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. सकाळी ८:३० च्या सुमारास श्री. सागर शिवाजी कळंबटे आणि माजी सरपंच श्री. गजानन गुरव यांनी याची माहिती वनपाल (पाली) यांना दूरध्वनीवरून दिली. माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
रेस्क्यू ऑपरेशन आणि गर्दीवर नियंत्रण
बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाने प्रथम ग्रामस्थांना सुरक्षित अंतरावर हटवले. विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
आरोग्य तपासणी आणि पुढील पावले
हा बिबट्या मादी जातीचा असून तिचे वय अंदाजे ६ ते ८ महिने आहे. मालगुंड येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वरूप काळे आणि डॉ. रानभरे यांनी या बछड्याची वैद्यकीय तपासणी केली. सध्या बिबट्यावर औषधोपचार सुरू असून त्याला वनविभागाच्या निगराणीखाली सुरक्षित ठिकाणी ठेवून योग्य आहार दिला जात आहे. या बछड्याच्या नैसर्गिक अधिवासाचा (मातेचा) शोध घेण्याचे कामही वनविभागाकडून सुरू आहे.
या मोहिमेत परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, एन. एस. गावडे (परिमंडळ वनाधिकारी, पाली), मिलिंद डाफळे (वनपाल), विराज संसारे, शर्वरी कदम, प्राजक्ता चव्हाण, धनंजय यादव, चालक महेश धोत्रे, प्राणीमित्र ईशान खानोलकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
“वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास किंवा अशा घटना घडल्यास नागरिकांनी स्वतः कोणताही धोका पत्करू नये. तात्काळ वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधावा,” असे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.









