५ धरणांमध्ये २५.३७ लाख क्युबिक मीटर पाणीसाठा
रत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरजोळे, उद्यमनगर, एमआयडीसी परिसरासह लगतच्या काही ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाऱ्या ५ धरणांमध्ये सध्या एकूण २५.३७ लाख क्युबिक मीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. यातील घाटीवळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, हा पाणीसाठा पुढील वर्षीच्या मे ते जून महिन्यापर्यंत पुरel या दृष्टीने एमआयडीसी प्रशासनाकडून योग्य ते नियोजन केले जात आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीसंकटातही येथील उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लांजा व रत्नागिरी तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीवर घाटीवळे, अंजणारी, असोडे, निवसर आणि हरचेरी या पाच ठिकाणी छोटी धरणे उभारण्यात आली आहेत. या सर्व धरणांची मिळून पूर्ण क्षमता २५.३७ लाख क्युबिक मीटर पाणी साठवण्याची आहे.
पाणीसाठ्यात वाढीव फळी व नियोजन
एमआयडीसीतर्फे हरचेरी येथे जुन्या धरणाच्या खालील बाजूला नवीन बंधारा बांधण्यात आला असून असोडे येथेही नवीन काम करण्यात आले आहे. या नवीन धरणांमुळे एकूण पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पाऊस संपल्यानंतर या धरणांमध्ये प्लेट व माती टाकून पाणी साठवणूक क्षमता कृत्रिमरीत्या वाढवली जाते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे पाणी अडवता येते. दरवर्षी हा वाढीव साठा करण्यासाठी एमआयडीसीतर्फे जवळपास १७ ते १८ लाखांचा खर्च केला जातो, तसेच ५ ते ६ महिने देखरेखीसाठी वॉचमनचीही नेमणूक केली जाते.
सध्या या पाच धरणांमध्ये एकूण २५.३७ लाख क्युबिक मीटर पाणीसाठा असून, त्यापैकी मृतसाठा वगळून प्रत्यक्ष वापरात येणारा २२.७७२ लाख क्युबिक मीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हरचेरी धरण: ६.६६ लाख क्युबिक मीटर, अंजणारी धरण: ७.४४ लाख क्युबिक मीटर घाटीवळे धरणः ३.२६२ लाख क्युबिक मीटर (पूर्ण क्षमतेने भरलेले), निवसर धरणः २.७१ लाख क्युबिक मीटर, असोडे धरणः २.७ लाख क्युबिक मीटर भरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, असोडे आणि अंजणारी धरणांमधील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत काहीशी घट दिसून येत आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी अचानक झालेल्या तीन-चार दिवसांच्या पावसामुळे घाटीवळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.









