रत्नागिरी:- रत्नागिरीमधल्या मिरजोळे औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीतील सुमारे 140 कामगारांचे पगार अनेक महिन्यांपासून थकले आहेत. कंपनीकडून पगार देवू असे सांगितले जात आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कामगार हतबल झाले आहेत. या कामगारांकडे नियुक्ती पत्र, नोकर करारनामा आदी कायदेशीर प्रक्रियेचे कागदपत्र नसल्याने कामगारांचे थकलेले पगार मिळतील की नाही, याबाबत साशंकता आहे.
मिरजोळे एमआयडीसीत पेपर कप, मॉप, अगरबत्ती, चप्पल, धूपस्ट्रीक अशी अनेक उत्पादने घेणारी कंपनी आहे. या कंपनीत इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, ऑपरेटरसह इतर पदांवर कामगार घेण्यात आले. परंतु कामगारांना कोणतेही नियुक्तीपत्र दिलेले नाही. नोकर करारनामा नाही किंवा इतर कागदोपत्री कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता त्यांच्याकडून कामे करून घेण्यात आली. प्रत्येक वेळी महिना पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसात पगार देवू, असे आश्वासन देण्यात आले. परंतु कामगारांना या आश्वासनाव्यतिरिक्त इतर काहीच मिळाले नाही. कंपनीच्या मालकी संबंधात असलेल्या 5 जणांकडे कामगारांकडून मोबाईलद्वारे संपर्क साधला जातो. ही मंडळी कोणाचाही फोन स्विकारत नसल्याने कामगारांना पगार मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. या पाच जणांपैकी आता रत्नागिरीतील एकाने आपला कंपनीशी काही संबंध नाही असे कामगारांना सांगण्यास सुरूवात केली आहे.