रत्नागिरी:- कोकणातील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळख असलेल्या मिरकरवाडा बंदरात अतिक्रमनांचा बाजार झाला होता. जागा मिळेल तिथे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे बंदराला बकाल स्वरुप प्राप्त झाले होते. नूतन मत्स्य व्यावसाय व बंदर मंत्री ना. नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत अतिक्रमणे स्वत: तोडा अन्यथा बुलढोझर फिरविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छिमारांना नोटीसा दिल्या होत्या. रविवारपर्यंत काही मच्छिमारांनी आपली अतिक्रमणे स्वत:च काढली होती. सोमवारी पहाटेच मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी, पोलीस फौजफाट्यासह मिरकवाडा बंदरात पोहचले. त्यांनी दिवसभरात जेसीबीच्या साह्याने सर्व अतिक्रमणे हटविली. त्यामुळे आता बंदराने मोकळा श्वास घेतला आहे.
विकास कामाला अडथळा होत असलेल्या अतिक्रमांचे गांभीर्य आणि कोकण किनारपट्टीवरील मिरकरवाडा बंदराचे महत्व लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना.नितेश राणे यांनी आपले संपूर्ण लक्ष याकडे केंद्रित केले होते. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर केलेल्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये यंत्रणेला या अनधिकृत बांधकामांवर हातोडा फिरविण्याचे निर्देश त्यांनी दिले आणि यंत्रणा हलण्यास सुरुवात झाली.
दि. १६ जानेवारीला ७ दिवसांची मुदत देणारी नोटीस मच्छीमारांना देण्यात आली. त्यानंतरही यातून काही मार्ग काढून पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे हि कारवाई टाळता येईल का यासाठी काहींनी प्रयत्न सुद्धा केले. मात्र ना. नितेश राणे आणि मत्स्य व्यवसाय विभाग या निर्णयावर ठाम होता. गुरुवारी मुदत संपल्यानंतर येथील मच्छीमारांच्या मागणीनंतर बांधकामे स्वत:हून हटवण्यासाठी त्यांना तीन दिवस वाढवून देण्यात आले. त्याचवेळी मत्स्य व्यवसाय विभाग आणि पोलीस विभागाने आपापली कार्यवाही करण्यास शुक्रवार पासूनच सुरुवात केली.
शुक्रवारी मिरकरवाडा येथे पोलीस बंदोबस्तात लाऊड स्पीकरवर अनधिकृत बांधकामे स्वत:हून हटवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर त्याला काही व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला.तर सोमवारी पहाटे ५ वाजताच पोलिसांच्या फौजेसह मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी ५ जेसीबी आणि डंपरसह मिरकरवाडा येथे हजर झाले. सकाळी पावणे सात वाजता पहिला हातोडा, बुलडोझर मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामावर पडला. त्यानंतर न थांबता सकाळी ११ वाजेपर्यंत बंदरावरील सुमारे ७० टक्के बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती.
यावेळी मत्स्य व्यवसायचे सहाय्यक संचालक व्ही. एम. भादुले, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव, बंदर अधिकारी, बंदर निरीक्षक जीवन सावंत आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. स्वत: पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डिवायएसपी निलेश माईणकर यांच्यासह २ उपविभागीय पोलीस अधिकारी, ५ पोलीस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षक, १५३ पोलीस अंमलदार, प्रत्येकी ३० पोलिसांचा समावेश असलेल्या अशा ३ आरसीपी प्लाटून तसेच सागर सुरक्षा रक्षक दलाचे जवानही तैनात होते. त्यामुळे दुपारपर्यंत हि कारवाई शांततेत पार पडली. या कारवाईमुळे येथील मासे विक्री दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे.