Wednesday, September 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत अडथळ्यांवर आजपासून कारवाई

मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत अडथळ्यांवर आजपासून कारवाई

मत्स्यव्यवसाय विभागाचा कडक इशारा; आजपासून धडक मोहीम

रत्नागिरी:- रत्नागिरी येथील ऐतिहासिक व महत्त्वाच्या मिरकरवाडा बंदरातील वाहतूक आणि दैनंदिन कामकाजात अडथळा ठरणार्‍या अनधिकृत साहित्यावर मत्स्यव्यवसाय विभागाने आता अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. बंदर परिसरात विनावापर आणि मोडकळीस आलेल्या नौका तसेच अस्ताव्यस्त पडलेले साहित्य हटवण्यासाठी प्रशासनाकडून आज बुधवार, २३ सप्टेंबरपासून व्यापक धडक मोहीम राबवण्यात येणार आहे.

मिरकरवाडा बंदर परिसरात अनेक नौका मालकांनी आपल्या मोडकळीस आलेल्या व विनावापर पडलेल्या नौका, नौकांचे केबिन आणि इतर अनावश्यक साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत सोडून दिले आहे. या साहित्यामुळे बंदरातील दैनंदिन कामकाज, नौकांची ये-जा आणि अंतर्गत वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे अंतिम इशारा दिला आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व संबंधित नौका मालकांनी बंदर परिसरात असलेले आपले विनावापर साहित्य आणि जुन्या नौका स्वखर्चाने २२ सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे हटवून घेणे आवश्यक होते. या दिलेल्या मुदतीत ज्या मालकांनी आपले साहित्य हटवले नाही, त्यांच्यावर २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मत्स्यव्यवसाय विभागामार्फत थेट कारवाई करून सर्व साहित्य निष्कासित केले जाईल.

प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कडक शब्दांत स्पष्ट केले आहे की या धडक कारवाईदरम्यान नौका किंवा संबंधित साहित्याचे काहीही नुकसान झाल्यास त्यास मत्स्यव्यवसाय विभाग अथवा शासन अजिबात जबाबदार राहणार नाही. या संदर्भातील कोणताही नुकसानभरपाईचा दावा ग्राह्य धरला जाणार नाही. बंदर परिसराच्या स्वच्छतेसाठी आणि हे सर्व अडथळे हटवण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च संबंधित नौका मालकांकडूनच वसूल केला जाणार आहे.
मोहिमेच्या दिवशी, म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी मिरकरवाडा जेटी परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना अनधिकृत पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कारवाईच्या वेळी अनधिकृत पार्किंग करून शासकीय कामकाजात किंवा वाहनांच्या हालचालीत अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर थेट कायदेशीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.