रत्नागिरी:- शासनाने सुरू केलेले प्रधानमंत्री मातृत्व वंदना अभियान ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांच्या आरोग्याला संरक्षक कवच देणारे ठरले आहे. या योजनेतून कोरोना टाळेबंदीत आणि त्यानंतरच्या डिसेंबर महिन्यात २९ हजाराहून अधिक लाभार्थी महिलांनी लाभ घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत १२ कोटी २१ लाख २३ हजाराचे अनुदान थेट बँक खात्यावर जमा झाले.
मातामृत्यु आणि बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गर्भवती महिलांना आर्थिक मदत देण्यास सुरवात केली. कोरोनातील टाळेबंदीमध्ये सर्वसामान्य कुटूंबातील महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी आरोग्य विभागाकडून कंबर कसली होती. आरोग्य विभागाने तळागाळातील आशा वर्कस्सह अंगणवाडी सेविकांचीही मदत घेतली होती. याचा लाभ तीन टप्प्यात दिला जातो. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पाच हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येतात. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या काळात ५ हजार १०० मातांना २ कोटी ४२ लक्ष २७ हजार रुपये लाभ दिला गेला. डिसेंबर २०२१ पर्यंत लाभार्थी संख्येत आणखीन वाढ झाली. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लाभार्थी लोकांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागात आजपर्यंत एकूण २५ हजार ७६३ लाभार्थी मातांना १० कोटी ७९ लाख ४१ हजार रुपये तर शहरी भागात एकूण ३ हजार ४८२ मातांना १ कोटी ४१ लाख ८२ हजार रुपये वितरीत करण्यात आले. मंडणगड, चिपळूण, रत्नागिरी हे तालुके आघाडीवर आहेत.