माझी लाडकी बहिण योजनेसाठी आतापर्यंत 66 हजार 507 अर्ज

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 66 हजार 507 अर्ज दाखल झाले आहेत. तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात रत्नागिरी जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. गेले काही दिवस बंद असलेला नारीशक्ती दूत हा ॲपही मंगळवारपासून सुरळीत सुरु असल्याने जिह्यातील संभाव्य लाभार्थी महिलांचे अर्ज ॲपवर भरण्याच्या कामाला आता वेग आला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी रत्नागिरी जिह्यातून 4 लाखाहून अधिक लाभार्थी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या योजनेचा लाभ जास्तीत-जास्त महिलांना मिळावा, यासाठी महिला व बालविकास तसेच महसूल विभागाकडून कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बुधवार 10 जुलैपासून नारीशक्ती दूत ॲपचा वेग वाढल्याचे जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत 66 हजार 507 अर्ज दाखल झाले असून यामध्ये 5 हजार 416 अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आले आहेत तर 61 हजार 91 ऑफलाईन अर्ज भरण्यात आले आहेत.

राज्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वच ठिकाणी चढाओढ लागली आहे. सध्या ऑनलाईन फॉर्म भरण्यात गडचिरोली प्रथम, पुणे दुसर्‍या क्रमांकावर, सातारा तिसऱ्या क्रमांकावर तर रत्नागिरी चौथ्या क्रमांकावर आहे.

या योजनेसाठी दाखल झालेल्या अर्जांची ग्रामस्तरावर, तालुका स्तरावर व जिल्हास्तरावर होणार छाननी होणार आहे. ग्रामस्तरावरील समितीत ग्रामसेवक, तलाठी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा सहभाग असेल. तालुकास्तरीय समितीमध्ये अशासकीय सदस्य, नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त, एकात्मिक आदिवासी प्रकल्प सहाय्यक, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, संरक्षण अधिकारी 2 अशासकीय सदस्य व तहसीलदार सदस्य सचिव असणार आहेत. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री व सहअध्यक्ष जिह्यातील मंत्री असणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, मुख्याधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदस्य असणार आहेत तर या समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी असणार आहेत.