रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार तथा नगराध्यक्ष राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे राजन साळवी यांना रत्नागिरी मोठा झटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेने अथर्व साळवी यांच्या ऐवजी भाजपचे माजी नगरसेवक मुन्ना चवंडे यांना धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक 15 मधूनच राजन साळवी यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली. रत्नागिरीचे नगराध्यक्षपद देखील राजन साळवी यांनी भूषवले आहे. तर राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी हे प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक होते. मात्र शिवसेनेने राजन साळवी यांच्या मुलाला रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली आहे.
अथर्व साळवी यांना उमेदवारी न मिळाल्याने राजन साळवी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत मुलाला उमेदवारी नाकारल्यानंतर आता उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध रंगणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









