Tuesday, July 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी मांडवीत गुरांसह कुत्र्याला हटकल्याच्या रागातून मारहाण व दुखापत 

मांडवीत गुरांसह कुत्र्याला हटकल्याच्या रागातून मारहाण व दुखापत 

संध्या कोसुमकरसह ४ जणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील ८० फुटी हायवे भगवती किल्ला, मांडवी रस्त्यावर बसलेली गुरे हॉटेल मध्ये येत असल्याने व कुत्र्यांना हाकलणे या कारणावरुन एका महिलेसह तीन जणांना मारहाण व दुखापत केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित महिलेसह तीन जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. एक महिला व अन्य तीन व्यक्ती (रा. रत्नागिरी) असे संशयित आहेत. ही घटना शनिवारी (ता. ११) रात्री अकराच्या सुमारास भगवती किल्ला रोड मांडवी येथील हॉटेल शीव समोरील रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवम संजय शिवलकर (वय २८. वरची वाडी मांडवी, रत्नागिरी) यांच्या मालकीचे शिव हॉटेल आहे. भगवती किल्ला रस्त्यावरील त्यांच्या हॉटेलच्या समोर ५० ते ६० जनावरे बसलेली होती. त्या गुरांमधील एका गाईला कुत्रे चावलेले असल्याने ती गाय फिर्यादी यांच्या हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांना मारत होती. म्हणून फिर्यादी यांनी रात्री अकरा वाजताच्या सुमारास दुकानासमोर असलेल्या कुत्र्यांना हातवारे करुन हाकलत होते. त्यावेळी संशयित संध्या कोसुमकर हिच्यासह अन्य तिघेजण तरुण फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये आले काऊंटरवर बसलेले निलेश किसन शिरधनकर यांना संशयित महिलेने शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यावेळी फिर्यादी यांचे आई-वडिल त्यांना समजावण्यासाठी गेले असता संशयितांनी शिवीगाळ व धक्काबुकी केली. तसेच शुटींग करु नका असे निलेश शिरधनकर सांगत असताना एका संशयिताने त्यांच्या नाकावर फाइटने दुखापत केली. त्याला सोडविण्यासाठी फिर्यादी शिवम शिवलकर गेले असता त्यांना लोखंडी फाईटने मारहाण मारुन दुखापत केली. तसेच समिधा राकेश पिलणकर या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता संशयित महिलेने त्यांना ढकलून दिल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. या प्रकरणी शिवम शिवलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.